नांदेड : आंचल मामीडवार हिने सक्षम ताटे यांचे घर सोडून निघून गेल्याचा आरोप सक्षमच्या आईने केल्यानंतर अखेर आंचलने मौन सोडत आपली बाजू मांडली आहे. आंचलने जय महाराष्ट्र चॅनेलसमोर झालेली हकीकत सांगून सक्षमच्या घरच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आंचलने सांगितले की, तिने सक्षमच्या मृत्यूनंतर प्रामाणिकपणे तिथे राहायचे ठरवले. मात्र सक्षमच्या लहान भावाकडून तिला वाईट अनुभव येऊ लागले. तो तिला चुकीचे पद्धतीने हात लावू लागला. आंचलने हे सर्व सक्षमच्या आईला सांगितले. मात्र त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. अखेर या गोष्टी वाढू नये म्हणून आंचलने घर सोडण्याचा निर्णय घेतला. न सांगता घरातून निघून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे आंचल म्हणाली. कारण सिक्युरिटी म्हणून तैनात असलेल्या गार्डमार्फत तिने पोलीस अधिकाऱ्यांना घरातून जात असल्याचे रितसर कळवल्याचे सांगितले. सध्या ती तिच्या वडिलांच्या आईसोबत म्हणजेच आजीसोबत राहत आहे. दरम्यान, आपल्या मुलाची बदनामी होऊ नये म्हणून माझ्यावर पळून गेली असल्याचा आरोप केला जात आहे, असेही आंचलने नमूद केले. यासोबतच तिने अनेक धक्कादायक खुलासे यावेळी केले.
काही दिवसांपूर्वी आंचल मामीडवार घरातून निघून गेली असून तिच्यासोबत ताटे कुटुंबीयांचा कोणताही संपर्क नसल्याचे सक्षमच्या आईने माध्यमांना सांगितले होते. तसेच सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला अनेक वाईट घटनांचा सामना करावा लागत असून सक्षमच्या वडिलांना त्याच्या मृत्यूचा इतका जास्त धक्का बसला की, त्यांचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला, असेही सक्षमच्या आईने सांगितले होते. ज्यामुळे सक्षमची आई पूर्णपणे एकटी पडली होती.
सहा महिन्यांपूर्वी नांदेडच्या इतवारा परिसरात सक्षम ताटे या तरुणाची प्रेम प्रकरणातून त्याच्याच प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली होती. आंचल मामीडवार आणि सक्षम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र जात वेगळी असल्यामुळे मामीडवार कुटुंबीयांनी सक्षम ताटेसोबतच्या संबंधाला नकार दिला होता. इतकचं नव्हे तर सक्षमला गोळ्या घालून आणि त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या नावाची हळद लावत सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केले. तसेच आंचलने आयुष्यभर त्याच्या घरी राहण्याची शपथ घेतली होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती