US Soldiers Missing: दुसऱ्या महायुद्धापासून ते परदेशातील नंतरच्या अनेक संघर्षांपर्यंत, अमेरिकेच्या सैन्याच्या इतिहासात काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. त्यातला एक मोठा प्रश्न म्हणजे समुद्रात बेपत्ता झालेल्या सैनिकांचा पत्ता नक्की गेला कुठे? अमेरिकेच्या सैन्याच्या अंदाजानुसार, गेल्या अनेक दशकांत चकमकी, हवाई हल्ले, नौदलाच्या मोहिमा आणि अपघातांदरम्यान सुमारे 40 हजारांहून अधिक सैनिक समुद्रात कुठेतरी हरवले. त्या काळात उपलब्ध मर्यादित साधनांमुळे या सैनिकांच्या अवशेषांचा शोध कधीच पूर्णपणे घेता आला नाही. काही अपघाती ठिकाणे नकाशांत राहिली, पण तिथे नेमकं कोणती अवशेषे आहेत हे कधी स्पष्ट झालेच नाही.
मात्र आता हा धूसर भाग अमेरिकेने स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाने एका खास वैज्ञानिक मोहिमेला सुरुवात केली आहे, समुद्राच्या तळापर्यंत जाऊन त्या अवशेषांचा शोध घेण्याची. पण प्रभावी गोष्ट ही आहे की या वेळेस शोध जुन्या पद्धतीने नाही, तर एक अत्याधुनिक, सूक्ष्म वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाणार आहे.
या मोहिमेची संकल्पना मोठी साधी आहे. समुद्राच्या तळाशी विखुरलेल्या सूक्ष्म कणांमध्ये, गाळामध्ये आणि प्रवाळांमध्ये मानवाच्या शरीराचे अतिसूक्ष्म घटक आजही रसायनशास्त्रीय पातळीवर अडकून असू शकतात. कधी काळी एका सैनिकाचे शरीर ज्या ठिकाणी होते तिथला गाळ ‘मानवी’ आणि ‘मानवी नसलेला’ अशा दोन वेगवेगळ्या प्रकारांत ओळखता येईल अशी या तंत्रज्ञानाची कल्पना आहे. समुद्रात जेथे विमान कोसळले, जिथे नौदलाची जहाजे उद्ध्वस्त झाली, त्या ठिकाणी लहानात लहान कणांमधून ‘अवशेषांचा पुरावा’ मिळण्याची शक्यता वैज्ञानिक सांगत आहेत.
याच दिशेने काम सुरू झाले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील विशेष युनिट, आणि संशोधन करणारे सागरी वैज्ञानिक यांच्यात संयुक्त काम सुरू आहे. काही विशिष्ट अपघात स्थळांवरून समुद्रातील गाळ सॅम्पल म्हणून काढून, प्रयोगशाळेत त्याचे विश्लेषण होत आहे.
सायपन बेटाजवळचा एक प्रसंग यासाठी उदाहरण म्हणून पुन्हा चर्चेत आला आहे. 1944 मध्ये सायपनकडे जाताना, अमेरिकेचे एक लढाऊ विमान समुद्रात कोसळले होते. हे विमान आजही समुद्राच्या तळाशी आहे, पण आता त्या विमानाभोवती प्रवाळ वाढून संपूर्ण संरचना लपली आहे. त्या विमानात 3 सैनिक होते. त्यातील 2 चा थांगपत्ता आजवर लागला नाही. आता त्या परिसरातील गाळाची तपासणी करून, तिथे कधी मानवी अवशेष होते का याची खात्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.