Micro Drones: आधुनिक युद्धाची व्याख्या आता झपाट्याने बदलत आहे. मोठे रणगाडे, भलेमोठे बॉम्ब किंवा क्षेपणास्त्रे हे सर्व तंत्रज्ञान मागे पडत चालले आहे. संरक्षण संशोधन क्षेत्रात आज सर्वात वेगाने वाढणारे अस्त्र म्हणजे मायक्रो ड्रोन, ज्यांचा आकार एका मच्छरापेक्षा मोठा नाही. हवेवर तरंगणाऱ्या या सूक्ष्म यंत्रांची क्षमता इतकी प्रगत होत आहे की अमेरिका आणि चीनसारखे बलाढ्य देशही त्यांचा पाठलाग करत आहेत.
ही मायक्रो ड्रोन इतकी सूक्ष्म आहेत की सामान्य डोळ्यांना दिसतच नाहीत, आवाज तर पूर्णतः निःशब्द. आणि सर्वात मोठं तथ्य त्यांना थांबवणं जवळजवळ अशक्य आहे.
ड्रोन्सचे भविष्य: ‘सूक्ष्म युद्ध’ सुरू?
जगभरात सुरु असलेल्या संघर्षांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ड्रोन्स हे आता फक्त “सहायक यंत्र” नसून “मुख्य अस्त्र” बनले आहेत. युक्रेन युद्धातील अचूक हल्ल्यांनंतर ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आकाशाला भिडला आहे.
परंतु पुढच्या टप्प्यातून सर्वात मोठे गेमचेंजर ठरणार आहेत मायक्रो ड्रोन, ज्यांचे वजन एका छोट्या कीटकाइतके आणि आकार एका मच्छराएवढा असू शकतो.
या ड्रोनची वैशिष्ट्ये:
हवेत झेप घेणं अविश्वसनीय वेगात
लक्ष्य ओळखणं अत्यंत जलद
रडार किंवा सेन्सर्सना ओळखणं अवघड
आवाज जवळपास शून्य
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे ड्रोन भविष्यातील युद्धाचे “अदृश्य शस्त्र” ठरतील.
बॅटरी तंत्रज्ञान वाढलं तर ‘अजेय’
CSIS चे शस्त्र तज्ज्ञ जॅकरी कॅलेनबॉर्न यांनी सांगितलं; “सध्या मायक्रो ड्रोनची एकमेव कमतरता म्हणजे बॅटरी. पण एकदा ती कमकुवत बाजू दूर झाली की हे ड्रोन युद्धात कुणालाही नामोहरम करू शकतात. कारण एवढ्या छोट्या ड्रोनची ओळख करणे जवळजवळ अशक्य आहे.”
त्यांच्या मते, ज्या देशाकडे अत्याधुनिक मायक्रो ड्रोन असतील, त्याच्या विरोधात कोणताही शत्रू उभा राहू शकत नाही.
किती धोकादायक असू शकतात मायक्रो ड्रोन?
मायक्रो ड्रोनचे सर्वात घातक स्वरूप म्हणजे ड्रोन स्वॉर्म शेकडो किंवा हजारो ड्रोन एकाच वेळी पुढे जाणे.
यांचे संभाव्य उपयोग धक्कादायक आहेत
रासायनिक किंवा जैविक हल्ला
शत्रूच्या सैनिकांच्या परिसरात न दिसता घुसखोरी
वाहने, मिसाइल्स किंवा UAV ला धडक देऊन आत्मघातकी हल्ला
शहरांमध्ये गोंधळ निर्माण करणे
लक्ष्याला क्षणार्धात वेढणं
तज्ज्ञ सांगतात की अशा परिस्थितीत कोणतीही एअर डिफेन्स सिस्टिम प्रभावी ठरणे अशक्य आहे.
अमेरिकेची तयारी: ‘स्वचालित युद्ध’ जवळ?
अमेरिकेतील अनेक संरक्षण कंपन्या स्वॉर्म ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्पर्धेत आहेत. हे ड्रोन पुढील कामे स्वतः करू शकतील:
लक्ष्य निवडणे
हवेत दिशा बदलणे
स्वतःच रणनिती ठरवणे
शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेणे
एका तज्ज्ञाने तर भाकीत केले “आगामी काळात ५० डॉलरच्या मायक्रो ड्रोनने ५० लाख डॉलरचे मिसाइल पाडताना आपण पाहू.”
युद्धाचा नव्या युगाचा आरंभ
मानवी सूचनांशिवाय स्वतः निर्णय घेणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानामुळे जग ‘स्वचालित युद्धा’च्या युगात प्रवेश करत आहे.
या मायक्रो ड्रोनमुळे युद्ध फक्त अधिक घातकच नव्हे, तर अधिक अदृश्य आणि अनपेक्षित होणार आहे.
जगातील महासत्तांनी त्याच्या मागे वेड्यासारखी धाव का लावली आहे, याचे उत्तर यातच आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.