Nepal Flood Missing Mumbai Tourists: नेपाळमध्ये अचानक निर्माण झालेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे अंधेरीतील डॉ. मिलिंद चितळे यांच्या ‘हिल्स अँड ट्रेल्स’ या ग्रुपच्या 60 पर्यटकांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. हा ग्रुप नेपाळ-तिबेट सीमेवरील रसुवागढी येथील इमिग्रेशन केंद्रावर असतानाच पुराचा तडाखा बसल्याची माहिती समोर आली आहे. या ताफ्यामध्ये मुंबईतील वेंकटराम अन्नमदेवरा आणि अनघा अन्नमदेवरा हे दांपत्यही प्रवास करत होते. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8:27 वाजता फ्रेंडशिप ब्रिजजवळ त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता. तेव्हापासून त्यांच्याशी कोणताही संवाद होऊ शकलेला नाही.
भरल्या डोळ्यांनी तन्वीने दिली NEET PG ची परीक्षा
बेपत्ता दांपत्याची मुलगी आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर तन्वी अन्नमदेवरा हिने तिच्या tanvimakesvideos या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरून अत्यंत भावूक व्हिडिओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली आहे. आई-वडील महापुरात अडकलेले असतानाच तन्वीची NEET PG ची परीक्षा होती. ‘परीक्षा केंद्रात स्क्रीनवर माझ्या ॲडमिट कार्डवरील फोटो दिसत होता, जो बाबांनी स्वतः काढला होता. 3 तासांच्या या परीक्षेतील जवळपास 1.5 तास मी फक्त रडतच होते,’ अशा शब्दांत तिने आपल्या वेदना व्यक्त केल्या. बाबांची इच्छा होती म्हणून डोळ्यांतील अश्रू पुसत तिने ही परीक्षा पूर्ण केली.
हेही वाचा – Nepal Flood: महापुराच्या भीषण संकटात ‘ती’ साडी ठरली जीवनदायिनी; 21 भाविकांच्या सुटकेचा थरार.. मात्र अद्याप..
‘आईने पुन्हा दही-साखर भरवण्यासाठी परत यावंच लागेल’; तन्वीला अश्रू अनावर
आपल्या आई-वडिलांच्या आठवणी सांगताना तन्वी व्हिडिओमध्ये प्रचंड भावूक झाली. ‘दरवेळी परीक्षेला जाण्यापूर्वी आई नेहमी चमच्याने दही-साखर भरवायची आणि बाबा ऑल द बेस्ट म्हणायचे. पण या परीक्षेच्या वेळी माझ्यासोबत तसं काहीच घडलं नाही. माझ्या आई-वडिलांनी सुरक्षित परत आलंच पाहिजे, त्यांना यावंच लागेल; कारण आईला मला पुन्हा दही-साखर भरवायची आहे,’ असं म्हणत तन्वीला अश्रू अनावर झाले. तिने आपल्या फॉलोअर्सना आणि देशवासियांना आई-वडिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
हिल्स अँड ट्रेल्सच्या पर्यटकांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू
रिचा टूर्स आणि हिल्स अँड ट्रेल्सच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेला हा ग्रुप सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत अडकला आहे. स्थानिक प्रशासन, भारतीय दूतावास आणि आपत्ती व्यवस्थापन पथके रसुवागढी भागातील बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मुंबईतील नातेवाईक आणि तन्वीसारखी मुले आपल्या पालकांच्या सुरक्षित पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.