इस्रायल: मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे अमेरिकेने युद्ध समाप्तीसाठी 9 एप्रिल, 2026 ही तारीख निश्चित केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर कारवाई करण्याचा निर्णय पाच दिवसांसाठी पुढे ढकलल्याची माहिती दिली असून दुसरीकडे इस्रायलने त्यांची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगत, इस्रायल सुरक्षेसाठी सुरू असलेल्या कारवाया थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले.
नेतन्याहू यांच्या मते, अमेरिकन सैन्याने मिळवलेल्या यशाचा फायदा घेत युद्धातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही राजनैतिक शक्यता तपासल्या जात आहेत. तथापि, इस्रायलचे राष्ट्रीय हित कोणत्याही परिस्थितीत धोक्यात येऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. या संदर्भात भविष्यातील कोणताही करार इस्रायलच्या सुरक्षेची हमी देणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इस्रायली नेतृत्वाने इराण आणि लेबनानविरोधातील कारवाया सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. नेतन्याहू यांनी सांगितले की, इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर आणि अणु कार्यक्रमावर दबाव कायम ठेवला जात आहे. त्याचबरोबर लेबनानमध्ये सक्रिय असलेल्या हिज्बुल्ला संघटनेवरही सातत्याने हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी दोन इराणी अणु वैज्ञानिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेली मुदत अमेरिकेने वाढवली आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर तातडीने कारवाई न करता पाच दिवसांचा अवधी दिला असल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिका इराणमधील एका प्रभावशाली नेत्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिकेच्या प्रस्तावित करारामध्ये इराणच्या अणु क्षमतेवर मर्यादा आणण्याचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. त्याअंतर्गत इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करण्यास तयार असावे, अशी अपेक्षा वॉशिंग्टनकडून व्यक्त करण्यात येत आहे. या माध्यमातून मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत दिले जात आहेत.
मात्र, इराणने कोणत्याही प्रकारच्या चर्चेला स्पष्ट नकार दिला आहे. तेहरानने असा आरोप केला आहे की, अमेरिकेच्या इशाऱ्यांमुळेच वॉशिंग्टन आता मागे हटत आहे. तसेच काही आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून पसरवण्यात येणाऱ्या बातम्यांद्वारे आर्थिक बाजारपेठांना स्थिर दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा इराणने केला.
या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेतही अस्थिरता निर्माण झाली आहे. तेलाच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट झाली असली, तरी गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यास त्याचा परिणाम ऊर्जा बाजारपेठ आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: Iran-Israel War End : अखेर इराण-इस्रायल युद्ध संपणार? तारीखही आली समोर पण…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.