Sheikh Yousuf Afridi Killed : लष्कर-ए-तैयबाचा कमांडर दहशतवादी शेख यूसूफ आफ्रिदीचा पाकिस्तानात खात्मा

युसूफ आफ्रिदीची हत्या ही केवळ एक स्वतंत्र घटना नसून, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात हाय-प्रोफाईल दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरू आहे.
Sheikh Yousuf Afridi Killed : लष्कर-ए-तैयबाचा कमांडर दहशतवादी शेख यूसूफ आफ्रिदीचा पाकिस्तानात खात्मा

Top LeT Terrorist Sheikh Yousuf Afridi Killed : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. संघटनेचा महत्त्वाचा कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याची अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. आफ्रिदीवर हल्लेखोरांनी अनेक राऊंड फायर केले. त्यामुळे त्याला स्वतःचा जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आफ्रिदी हा 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदचा अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानला जात होता. या भागात 'लष्कर'च्या कारवायांचे नियोजन करण्यात त्याचा मोठा वाटा होता.

दहशतवाद्यांना टिपून हत्या करण्याचे सत्र सुरूच
युसूफ आफ्रिदीची हत्या ही केवळ एक स्वतंत्र घटना नसून, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात हाय-प्रोफाईल दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरू आहे. गेल्या महिन्यातच लाहोरमध्ये लष्करचा संस्थापक सदस्य अमीर हमजा (67) याच्यावरही प्राणघातक हल्ला झाला होता, ज्यातून तो थोडक्यात बचावला. तसेच, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वर याचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. अशा प्रकारे पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना एकापाठोपाठ एक अज्ञात हल्लेखोर कंठस्नान घालत आहेत. सध्या भारतवासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि सोबतच भारताच्या शत्रूंना कोण संपवतंय याचीही उत्सुकता लोकांच्या मनात आहे.

हेही वाचा – Iran Pakistan Talk: 'आमचे शेजारी आहात, पण मध्यस्थ म्हणून तुमच्यावर विश्वास नाही'; इराणचा पाकिस्तानला मोठा झटका, भर सभेत काढले वाभाडे

दहशतवादी संघटनांची मोठी हानी
2026 सालात आतापर्यंत लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित किमान 30 दहशतवाद्यांची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अबू कतल उर्फ कतल सिंधी याला झेलम सिंध येथे ठार करण्यात आले होते. कतल हा 2024 मधील रियासी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता आणि 33 लोक जखमी झाले होते. लाहोर, कराची आणि इतर शहरांमध्ये लपलेल्या या भारतविरोधी शक्तींना आता स्वतःच्याच सुरक्षित आश्रयामध्ये म्हणजेच पाकिस्तानातील त्यांच्या नंदनवनात मृत्यूची भीती वाटू लागली आहे.

अज्ञात हल्लेखोरांचा वाढता दबदबा
2023 पासून पाकिस्तानात दहशतवाद्यांना संपवण्याचे एक विशिष्ट 'पॅटर्न' दिसून येत आहे. अवघ्या 7 महिन्यांच्या कालावधीत 7 कुख्यात दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले होते. युसूफ आफ्रिदी हा खैबर पख्तुनख्वामधील लष्करच्या ऑपरेशनचा महत्त्वाचा दुवा असल्याने, त्याच्या मृत्यूमुळे या संघटनेचे स्थानिक जाळे विसकळीत होण्याची शक्यता आहे. ही 'टार्गेटेड अ‍ॅसेसिनेशन'ची मालिका कोणी चालवली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामुळे दहशतवादी संघटनांच्या गोटात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – Iran Oman Relations: इराण-ओमानमध्ये मोठी खलबतं; 'होर्मुज'मध्ये इस्रायलला घेरण्याची तयारी?, समुद्री मार्गांच्या सुरक्षेसाठी मस्कतमध्ये हायव्होल्टेज बैठक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version