वॉशिंग्टन: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी परिसरातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. इराणने या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील वाहतूक नियंत्रित करत फक्त “मित्र राष्ट्रांनाच” जहाजे जाण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत इराणने अमेरिकेककडे तेलाने भरलेली 20 मोठी जहाजे पाठवल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, ही जहाजे होर्मुज सामुद्रधुनीमार्गे पाठवली जात असून ही प्रक्रिया काही दिवस सुरू राहणार आहे. ट्रम्प यांनी या कृतीला “आदराचे प्रतीक” असे संबोधले.
ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत विमान 'एअर फोर्स वन' वर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “इराण आता करारासाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला 10 जहाजांवर सहमती झाली होती, मात्र आता त्यांनी ती संख्या वाढवून 20 केली आहे.” त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे.
याच वेळी अमेरिकेने इराणशी थेट तसेच मध्यस्थांमार्फत चर्चा सुरू असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र, चर्चेसोबतच लष्करी कारवायाही सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. “आम्ही त्यांच्या अनेक लक्ष्यांवर हल्ले करून मोठे नुकसान केले आहे. त्यांची नौदल आणि हवाई क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे,” असा दावा त्यांनी केला.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या 2015 च्या इराण अणुकरारावर टीका केली. त्यांनी या कराराला “अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट आणि मूर्खपणाचा करार” असे संबोधले.
ट्रम्प यांच्या मते, जर हा करार रद्द करण्यात आला नसता, तर आज इराणकडे अण्वस्त्रे उपलब्ध झाले असते. त्यामुळे आता अधिक कठोर आणि प्रभावी करार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, जागतिक पातळीवर त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.