History of Tel Aviv City and Meaning of Its Name : इस्रायलची आर्थिक राजधानी आणि आधुनिकतेचे केंद्र असलेल्या 'तेल अवीव' (Tel Aviv) या शहराचा इतिहास एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखाच रंजक आहे. आज कोट्यवधींच्या घरात उलाढाल असणारे आणि 33 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले हे महानगर कधीकाळी केवळ 66 ज्यू कुटुंबांच्या जिद्दीतून उभे राहिले होते. या शहराच्या नावाचा अर्थ आणि त्याच्या स्थापनेचा प्रवास ज्यू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची साक्ष देतो.
समुद्रकिनाऱ्यावरील लिलाव आणि शहराची पायाभरणी
तेल अवीवची सुरुवात 1909 मध्ये झाली. युरोपातील विविध शहरांतून आलेली 66 ज्यू कुटुंबे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर, जाफा बंदराजवळ एकत्र आली. त्यांना स्वतःचे एक हक्काचे घर हवे होते. जमिनीचे तुकडे कोणाला आणि कुठे मिळतील, हे ठरवण्यासाठी त्यांनी एक अनोखी पद्धत वापरली. त्यांनी समुद्रातील शिंपल्यांवर (Sea Shells) नावे लिहून चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यातून प्रत्येकाचा भूखंड निश्चित झाला. अशा प्रकारे 11 एप्रिल 1909 रोजी या शहराची अधिकृत पायाभरणी झाली.
'तेल अवीव' नावाचा खरा अर्थ काय?
सुरुवातीला या वस्तीचे नाव 'अहुजात बायित' (Ahuzat Bayit) असे होते, ज्याचा अर्थ 'घर' असा होतो. मात्र, 1910 मध्ये या शहराला 'तेल अवीव' हे नाव देण्यात आले. हे नाव हिब्रू बायबलमधील 'एझेकेल'च्या पुस्तकातून घेण्यात आले आहे. हिब्रू भाषेत या नावाचे दोन विशेष अर्थ होतात:
तेल (Tell): याचा अर्थ असा जुना ढिगारा किंवा टेकडी ज्याच्या खाली प्राचीन संस्कृतीचे अवशेष गाडले गेले आहेत. हे नाव ज्यूंच्या प्राचीन इतिहासाचे प्रतीक आहे.
अवीव (Aviv): याचा अर्थ 'वसंत ऋतू' (Spring) असा होतो, जो नवीन जीवनाचे आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे.
थोडक्यात सांगायचे तर, "प्राचीन इतिहासाच्या अवशेषांवर फुललेले नवीन जीवन" किंवा "वसंताची टेकडी" असा या शहराचा अर्थ होतो.
आधुनिक शहराचे स्वप्न आणि अंमलबजावणी
झायोनिस्ट नेते आर्थर रुपिन यांनी 'ज्यू नॅशनल फंड'मधून कर्ज घेऊन हे शहर वसवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांना हे शहर युरोपीय धाटणीचे पण हिब्रू संस्कृती जपणारे बनवायचे होते. त्या काळी तयार केलेल्या ब्रोशरमध्ये या शहराचे जाहिरात दिली होती की, येथे पक्के रस्ते, फूटपाथ, वीज आणि प्रत्येक घरात नळाचे पाणी व सांडपाण्याची व्यवस्था असेल. त्याकाळी ही स्वप्ने वाटणारी गोष्ट या 66 कुटुंबांनी प्रत्यक्ष सत्यात उतरवली.
आजचे तेल अवीव: इस्रायलचे आर्थिक केंद्र
आज तेल अवीव हे इस्रायलमधील जेरुसलेमनंतरचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इस्रायलचे प्रमुख आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते. या शहराच्या मेट्रोपॉलिटन परिसराला 'गुशदान' असे म्हटले जाते. अवघ्या 117 वर्षांपूर्वी एका ओसाड वाळवंटी भागात सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात महागड्या आणि प्रगत शहरांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.