नाशिकमधील देवळा तालुक्यातील एका तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान घडली असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रेम प्रकरणातून प्रेयसीने तुरणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडला आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी युवतीसह कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे. युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
देवळा तालुक्यातील गोरख काशिनाथ बच्छाव याचे एका मुलीशी तीन वर्षांपासून ओळख होती. तर हा युवक या मुलीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होता. या रागातून मुलीचे आईवडील, दोन भाऊ आणि मुलीने लोहोणेर ग्रामपंचायतसमोर गोरख बच्छाव यास बेदम मारहाण केली. तसेच यावेळी त्या मुलीने मुलाच्या अंगावर इंधन फेकून मुलाला जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात हा युवक ५५ टक्के भाजला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.