नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अवघ्या 15 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या या युवा खेळाडूचा इंग्लंड दौरा विशेष ठरणार आहे. मात्र, मैदानावरील कामगिरीइतक्याच एका वेगळ्या कारणामुळेही वैभव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बिहारचा हा युवा क्रिकेटपटू भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यावर वरिष्ठ संघासोबत जाणार आहे. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार असून त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सहभागी होणार आहे.
मात्र, इंग्लंडमध्ये लागू असलेल्या सुरक्षाविषयक नियमांमुळे वैभवसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) नियम अल्पवयीन खेळाडूंना प्रौढ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे वैभवसाठी प्रत्येक सामन्याच्या ठिकाणी स्वतंत्र ड्रेसिंग रूमची व्यवस्था केली जाणार आहे.
यासंदर्भात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) समन्वय साधला असून, सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
वैभवच्या वयाचा विचार करून आणखी एक विशेष निर्णय घेण्यात आला आहे. दौऱ्यादरम्यान त्याचे आई-वडीलही त्याच्यासोबत असणार आहेत. सामान्यतः राष्ट्रीय संघासोबत कुटुंबीयांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र, वैभव अल्पवयीन असल्यामुळे या नियमात अपवाद करण्यात आला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या मते, कुटुंबीय सोबत असल्यामुळे वैभवला आवश्यक मानसिक आधार आणि काळजी मिळेल. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेबाबत अधिक खात्री वाटत असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
इंग्लंडमधील क्रीडा क्षेत्रात 16 वर्षांखालील खेळाडूंना स्वतंत्र ड्रेसिंग रूम देण्याची पद्धत सर्वसाधारण मानली जाते. मात्र, भारतात असा कोणताही नियम नसल्याचे दिसून येते. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने वरिष्ठ खेळाडूंसोबतच ड्रेसिंग रूम वापरली होती.
दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात वैभवला संधी मिळाल्यास तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरू शकतो. सध्या हा विक्रम भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. वैभवच्या निवडीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.