मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात सध्या खेळापेक्षा आयसीसीसोबतचे प्रशासकीय 'युद्ध' अधिक तापताना दिसत आहे. आगामी 2026 च्या टी-20 विश्वचषकातून बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीने (ICC) कठोर पाऊल उचलत त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी दिली आहे. मात्र, आयसीसीच्या या निर्णयामुळे शेजारील देश पाकिस्तानचा 'तीळपापड' झाला असून, त्यांनीही या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिल्याने वादाला तोंड फुटले आहे.
पाकिस्तानची 'दुहेरी चाल' आणि पीसीबीचा संताप
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आयसीसीवर 'दुटप्पी भूमिकेचा' (Double Standards) आरोप करत तोफ डागली आहे. "एका देशाला झुकते माप आणि दुसऱ्यावर अन्याय, असे राजकारण क्रिकेटमध्ये चालणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. बांगलादेशवर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत, पाकिस्तानही या विश्वचषकातून माघार घेऊ शकतो, असे संकेत नक्वी यांनी दिले आहेत. दरम्यान, हा निर्णय सर्वस्वी पाकिस्तान सरकारचा असेल, असे सांगून त्यांनी चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.
आयसीसीचा 'हंटर': थेट बंदी आणि PSL वर संकट
पाकिस्तानच्या या धमकीवजा इशाऱ्याला आयसीसीने जशास तसे उत्तर दिले आहे. आयसीसीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने या स्पर्धेवर बहिष्कार टाकला, तर त्याचे परिणाम अत्यंत भयावह असतील. केवळ विश्वचषकच नव्हे, तर पाकिस्तानला इतर देशांसोबतच्या द्विपक्षीय मालिका खेळण्यावरही बंदी घातली जाईल. इतकेच नाही तर पाकिस्तान सुपर लीगमधील (PSL) परदेशी खेळाडूंचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) रद्द करण्याची ताकीदही देण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानचे क्रिकेटचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.
आशिया चषकातूनही पत्ता कट होणार?
आयसीसीने केवळ जागतिक स्तरावरच नव्हे, तर आशियाई स्तरावरही पाकिस्तानची कोंडी करण्याची तयारी केली आहे. बहिष्कार टाकल्यास पाकिस्तानला आगामी आशिया चषकातूनही बेदखल केले जाईल, असे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानसाठी हा इशारा धोक्याची घंटा मानला जात आहे. सद्यस्थितीत पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत नियोजित असतानाही, अशा प्रकारची टोकाची भूमिका घेणे त्यांच्यासाठी 'स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे' ठरू शकते.
युगांडाची लॉटरी लागणार? 7 फेब्रुवारीपासून थरार
जर पाकिस्तानने खरोखरच स्पर्धेतून माघार घेतली, तर त्यांच्या जागी युगांडासारख्या उदयोन्मुख संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते. 7 फेब्रुवारीपासून या महाकुंभाला सुरुवात होत असून, पहिल्याच दिवशी तीन रोमांचक सामने रंगणार आहेत. क्रिकेटच्या या 'महायुद्धा'त आता पाकिस्तान नमती भूमिका घेणार की कारण नसताना संकटात उडी घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 'विनाशकाले विपरीत बुद्धी' अशी पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.