Sunil Gavaskar Emotional for Nari Contractor : भारतीय क्रिकेटचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचा एक अत्यंत भावुक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांना 'लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' प्रदान करताना गावस्कर यांचे डोळे पाणावले आणि त्यांचा कंठ दाटून आला. आपल्या आदर्श खेळाडूला सन्मानित करताना गावस्कर यांना आपल्या भावना अनावर झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले.
ओपनिंग बॅटिंगसाठी लागणारे ते असामान्य धाडस
पुरस्कार प्रदान करण्यासाठी उभे राहिलेले सुनील गावस्कर म्हणाले की, "मला हा अवॉर्ड देताना प्रचंड अभिमान वाटत आहे." इतके बोलताच गावस्कर भावुक झाले. त्यांनी नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. "आम्ही यांच्याकडून खूप काही शिकलो. सलामीला फलंदाजी करण्यासाठी जे धाडस लागते, ते आम्हाला यांच्याकडूनच पाहायला मिळाले," असे म्हणताना गावस्कर यांचे डोळे भरून आले होते. गावस्कर यांनी पुढे सांगितले की, आजच्या पिढीसाठी हेलमेटशिवाय वेगवान गोलंदाजांचा सामना करणे अशक्य वाटते, पण त्या काळात नरी कॉन्ट्रॅक्टरसारखे खेळाडू केवळ जिद्दीच्या जोरावर मैदानात उभे राहायचे.
1959 च्या लॉर्ड्स कसोटीतील तो थरार
सुनील गावस्कर यांनी यावेळी 1959 च्या लॉर्ड्स कसोटीतील एक प्रेरणादायी किस्सा सांगितला. गावस्कर म्हणाले, "मी त्यावेळी रेडिओवर कॉमेंट्री ऐकत होतो. खेळाच्या सुरुवातीलाच एक चेंडू नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या छातीवर येऊन आदळला, ज्यामुळे त्यांच्या बरगड्या मोडल्या. अशा भीषण दुखापतीनंतर कोणताही खेळाडू मैदान सोडून गेला असता, पण नरी यांनी हार मानली नाही. त्यांनी तब्बल 3 तास फलंदाजी केली आणि धावफलकावर 81 धावा लावल्या. गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या आमच्यासारख्या मुलांसाठी ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी होती."
हेल्मेटशिवाय जिवावर उदार होऊन बॅटिंग
गावस्कर यांनी पुढे सांगितले की, देशासाठी खेळायचे असेल तर जिवावर उदार होऊन खेळावे लागते, हे मला नरी यांच्याकडे पाहूनच उमजले. एका सामन्यात नरी यांच्या डोक्याला चेंडू लागला होता, तरीदेखील त्यांनी जिद्दीने पुनरागमन केले. "त्याकाळी हेल्मेट्स नव्हते, तरीदेखील त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. त्यांच्या या जिद्दीनेच आम्हाला कठीण परिस्थितीत कसे खेळायचे हे शिकवले;" असे म्हणत गावस्कर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा सन्मान केवळ नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा नसून तो भारतीय क्रिकेटमधील एका सुवर्णकाळाचा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – BCCI NAMAN Awards 2026 जाहीर; शुभमन गिल ‘पॉली उमरीगर’ पुरस्काराने सन्मानित, स्मृती मंधानाचाही मोठा गौरव
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.