मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री क्रिकेटच्या थराराचा एक नवा अध्याय लिहिला गेला. टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड या दोन तुल्यबळ संघांमध्ये रंगलेला हा महासंग्राम क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा ठरला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने संयमाची आणि कौशल्याची चुणूक दाखवत इंग्लंडला सात धावांनी धूळ चारली आणि दिमाखात चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या रोमहर्षक विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे उधाण आले असून, वानखेडेची रात्र भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरली.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या 254 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा बचाव करताना गोलंदाजांचा कस लागला होता. तत्पूर्वी, भारताच्या डावात आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवणाऱ्या संजू सॅमसनला या महत्त्वाच्या सामन्यात ‘सामनावीर’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. सॅमसनच्या या खेळीनेच खऱ्या अर्थाने भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला होता, ज्यावर गोलंदाजांनी नंतर विजयाचा कळस चढवला.
विजयाचे महाकाय आव्हान पेलताना इंग्लंडच्या संघानेही सहजासहजी शस्त्रे टाकली नाहीत. मधल्या फळीतील फलंदाज जेकब बेथेल याने एकाकी झुंज देत झळकावलेल्या वादळी शतकाने काही काळ भारतीय गोटात शांतता पसरवली होती. मात्र, मोक्याच्या क्षणी भारताचे प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराह याने भेदक मारा करत चार षटकांत केवळ 33 धावा देऊन एक महत्त्वाचा बळी घेतला. त्याला अष्टपैलू हार्दिक पंड्याची मोलाची साथ लाभली, ज्याने 38 धावांच्या मोबदल्यात दोन गडी बाद करत इंग्लंडच्या आक्रमणाला वेसण घातली आणि संघाचा विजय निश्चित केला.
या रंगतदार सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर अनेक आजी-माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारकांनी हजेरी लावली होती. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भारताचा माजी कर्णधार आणि ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी व त्याची पत्नी साक्षी यांनी. सामन्यात जेव्हा इंग्लंड लक्ष्याचा पाठलाग करत विजयाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा प्रेक्षागृहात बसलेल्या भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकत होता. याच तणावपूर्ण वातावरणात साक्षी आणि धोनी यांचा एक मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याची सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चा रंगली आहे.
सामन्याच्या अत्यंत निर्णायक अशा 18 व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या सॅम करनने एक फटका मारला, जो एक टप्पा पडून थेट बुमराहच्या हातात विसावला. हा झेल म्हणजे विकेट असल्याचे समजून साक्षी धोनीने आनंदाच्या भरात जागेवरून उड्या मारत जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर कायम स्थितप्रज्ञ राहणाऱ्या धोनीने अत्यंत शांतपणे तिला तो चेंडू जमिनीवर आदळून हातात गेल्याचे (बंप बॉल) समजावून सांगत साक्षीला खाली बसवले.
Funniest moment of the match when Sakshi bhai started celebrating the bump catch pic.twitter.com/Do0SK2WWYo — Sunil The Cricketer (@1sInto2s) March 5, 2026
साक्षीचा हा भाबडा आनंद आणि धोनीची समजूतदार प्रतिक्रिया पाहून बाजूलाच बसलेला भारताचा धडाकेबाज खेळाडू रोहित शर्मा यालाही हसू आवरले नाही. सरतेशेवटी, इंग्लंडचा डाव 20 षटकांत 7 बाद 246 धावांवर रोखण्यात भारताला यश आले आणि एका संस्मरणीय विजयासह भारताने फायनलचे तिकीट पक्के केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.