टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आज तुकाराम सुपे यांच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांना त्यांच्या घरी, कार्यालयातून ३३ लाख रुपये सापडले आहेत.
टीईटी घोटाळाप्रकरणी आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्याकडून तीन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर दीड किलो सोन्याची दागिनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत ७३ लाख इतकी आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरूच ठेवला आहे.
तुकाराम सुपेंच्या घरी तपासादरम्यान कोट्यवधी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे तुकाराम सुपेंनी कोट्यवधींची माया जमवली कशी? असा सवाल तपास यंत्रणेच्या पुढे उपस्थित झाला आहे. त्यामुळे तुकाराम सुपेंचे घबाड नक्की कितीचे? असा सवालही उपस्थित होत आहे.
आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरातून पुणे सायबर पोलिसांना टीईटी परिक्षेची कागदपत्रे आढळली. त्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू झाला. दरम्यान परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि त्यानंतर पुणे सायबर सेलने कारवाई करत तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.