IPL 2026 New Record: एकाच सामन्यात 20 ‘डॉट बॉल्स’; ‘या’ खेळाडूने मोडला दिग्गज गोलंदाजांचा विक्रम; IPL मध्ये रचला नवा इतिहास

त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 1.75 इतका राहिला, जो आयपीएलसारख्या स्पर्धेत अत्यंत दुर्मीळ मानला जातो.
IPL 2026 New Record: एकाच सामन्यात 20 ‘डॉट बॉल्स’; ‘या’ खेळाडूने मोडला दिग्गज गोलंदाजांचा विक्रम; IPL मध्ये रचला नवा इतिहास

नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध साखळीतील 39व्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. या सामन्यात बेंगळुरूच्या गोलंदाजांनी अक्षरशः वर्चस्व गाजवत दिल्लीचा डाव अवघ्या 75 धावांवर गुंडाळला. सामन्यातील ही एकतर्फी लढत प्रेक्षकांसाठी थरारक ठरली.

या विजयात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जॉश हेजलवुड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांनी मिळून तब्बल 7 विकेट्स घेत दिल्लीच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्यांच्या अचूक आणि धारदार गोलंदाजीसमोर दिल्लीचे फलंदाज पूर्णपणे हतबल झालेले दिसले.

मात्र या सामन्यात खरी चर्चा रंगली ती युवा फिरकीपटू सुयश शर्मा याच्या कामगिरीची. अवघ्या 22 वर्षांच्या सुयशने त्याच्या फिरकीच्या जादूने दिल्लीच्या फलंदाजांना अक्षरशः गुंग करून सोडले. त्याने 4 षटकांत केवळ 7 धावा दिल्या, ज्यामध्ये 3 धावा वाईडमधून आल्या. त्याने एक मेडन षटक टाकत 1 महत्त्वाची विकेटही घेतली.

त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 1.75 इतका राहिला, जो आयपीएलसारख्या स्पर्धेत अत्यंत दुर्मीळ मानला जातो. हा स्पेल आयपीएल इतिहासातील संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात किफायतशीर स्पेल ठरला. या यादीत फक्त युजवेंद्र चहल याचा 1.5 इकॉनॉमी रेटसह स्पेल पुढे आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election 2026 : ठरलं! भाजप या दिवशी जाहीर करणार विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी; दिल्ली दरबारी होणार नावांवर शिक्कामोर्तब

याचबरोबर सुयश शर्माने 4 षटकांत तब्बल 20 डॉट चेंडू टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. आयपीएल इतिहासात एका सामन्यात कोणत्याही फिरकीपटूने इतके डॉट चेंडू टाकले नव्हते. यापूर्वी हा विक्रम वेगवान गोलंदाज दीपक चाहर याच्या नावावर होता, ज्याने 2019 मध्ये 20 डॉट बॉल्स टाकले होते. आता सुयश आणि चाहर या विक्रमाचे संयुक्त मानकरी ठरले आहेत.

सुयश शर्माने 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने बेंगळुरूविरुद्ध 30 धावा देत 3 विकेट्स घेत लक्ष वेधले होते. 2023 आणि 2024 हंगामात कोलकात्याकडून खेळल्यानंतर 2025 पासून तो बेंगळुरू संघाचा भाग आहे.

आतापर्यंत 34 आयपीएल सामन्यांत सुयशने 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा एकूण इकॉनॉमी रेट 8.55 असून, चालू हंगामात तो 7.84 इकॉनॉमीने धावा खर्च करत आहे. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे तो आगामी काळात संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

हेही वाचा: Bharat Kapoor Dies: रुपेरी पडद्यावरचा ‘सहज’ अभिनय हरपला! ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचं निधन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version