राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापलंय. भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भोंग्यांबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळण्याचं आवाहन केलंय. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी प्रशासनाची परवानगी असणं आवश्यक असल्याचंही म्हटलंय.
अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांना काही अटी घालून देत औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या अटींचं उल्लंघन झाल्याचं कळतंय. त्याबद्दल पोलीस त्यांचं काम करत आहेत. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, तसेच कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम देऊ नये. इथे हुकुमशाही नाही, काय अल्टिमेटम द्यायचे असतील तर ते तुमच्या घरात द्या, बाकी कोर्टाचे आदेश सर्वांसाठी सारखे आहेत, मग तो सर्वसामान्य नागरिक असेल अथवा अजित पवार, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान, भोंगे वापरण्यासाठी परवानगी न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. परंतु परवानगी लगेच एक-दोन दिवसांत मिळणार नाही, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ देण्यात येईल. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांना पाळावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा एका विशेष धर्मासाठी नाही. त्यामुळे तो आदेश फक्त एका धर्माने नाही, तर सर्व धर्मांनी पाळणं गरजेचं आहे, असंही अजित पवार म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.