इंदूर: ज्या लेकरासाठी 10 वर्षे नवस-सायास केले, ज्याच्या आगमनाने घराचे कोपरान् कोपरा आनंदाने न्हाऊन निघाला होता, त्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या अव्यानचा घास नियतीने अवघ्या सहा महिन्यांतच घेतला. निमित्त ठरलं ते इंदूर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आलेलं 'दूषित पाणी'. इंदूरमधील भगीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे झालेल्या अतिसाराच्या (Diarrhea) साथीत आतापर्यंत 10 जणांचा बळी गेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेने संपूर्ण देश हळहळत असून मध्य प्रदेश सरकारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भगीरथपुरा येथील मोहल्ल्यात राहणाऱ्या साहू कुटुंबासाठी हा धक्का सहन करण्यापलीकडचा आहे. अव्यानला दूध पाजताना त्यात मिसळलेलं थोडंसं पाणी त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. अवघ्या सहा महिन्यांच्या अव्यानने जगाचा निरोप घेतला. "आम्हाला सरकारची मदत नको, आमचं बाळ परत येईल का?" असा आर्त सवाल करत अव्यानच्या आजीने अश्रू ढाळले. सरकारने मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असली, तरी साहू कुटुंबाने ही मदत नाकारून प्रशासकीय हलगर्जीपणाचा निषेध केला आहे.
या भीषण घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तातडीने कठोर पावले उचलली आहेत. इंदूर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीपकुमार यादव यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे, तर पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप निगम यांना निलंबित करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त रोहन सिसोनिया यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. "दोषींना सोडले जाणार नाही," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपला संताप व्यक्त केला असून राज्यातील सर्व 16 महापालिकांच्या आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की, भगीरथपुरा भागात पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिनीला गळती लागली होती, ज्यामुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळले. याच दूषित पाण्यामुळे जवळपास 1400 जणांना बाधा झाली असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, अनेक दिवसांपासून पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, ज्याची किंमत निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणाने मोजावी लागली.
या घटनेने पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महापालिकांमधील पाणीपुरवठा विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी इतर शहरांमध्येही प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पाइपलाईन ऑडिट करण्याच्या सूचना मुख्य सचिव अनुराग जैन यांना देण्यात आल्या आहेत.
ज्या भगीरथपुरा भागात ही घटना घडली, तो भाग प्रामुख्याने मराठी बहुल आहे. गेल्या वर्षभरात या परिसरात दूषित पाण्यामुळे उलट्या आणि जुलाबाचे 10 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. प्रशासनाने जर वेळीच लक्ष दिले असते, तर आज अव्यान आणि इतर निष्पापांचे प्राण वाचले असते, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.