Maoists Killed in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा दलाने 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगडमधील सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये किमान 14 नक्षलवादी ठार झाले आहेत.
Maoists Killed in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा दलाने 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये किमान 14 नक्षलवादी ठार झाले आहेत, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे. या कारवाईमुळे राज्यातील नक्षलविरोधी अभियानाला मोठी चालना मिळाली आहे.

सुकमा जिल्ह्यातील सुकमा येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. किस्ताराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पलोडी आणि पोटकपल्ली परिसरातून जिल्हा राखीव दलाने (District Reserve Guard, DRG) ही कारवाई सुरू केली होती. किस्ताराम भागातील पामलूर गावाजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला.

या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये कोन्टा एरिया कमिटीचा सचिव मंगडू याचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून AK-47 आणि INSAS रायफल्ससह मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण मोहिमेवर सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांचे बारकाईने नियंत्रण होते.

हेही वाचा: Mumbai Local Mega Block: महत्त्वाची बातमी! मुंबई लोकलचा रविवारी 'चक्का जाम'; पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा ब्लॉक, कोणत्या मार्गावर काय परिणाम?

दरम्यान, याच दिवशी बिजापूर  जिल्ह्यातही स्वतंत्र चकमक झाली. पहाटे सुमारे पाच वाजता दक्षिण बीजापूरच्या जंगल भागात जिल्हा राखीव दलाने नक्षलविरोधी मोहीम राबवली. या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाले असून घटनास्थळावरून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असून अधूनमधून गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही संयुक्त कारवाई हाती घेण्यात आली होती. सुरक्षा दल सतत दबाव वाढवत असून नक्षलवाद्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत.

विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये झालेल्या विविध चकमकींमध्ये एकूण 285 नक्षलवादी ठार झाले होते. यापैकी 257 नक्षलवादी बस्तर विभागातील (बीजापूरसह सात जिल्हे) कारवायांमध्ये मारले गेले, तर उर्वरित 27 नक्षलवादी रायपूर विभागातील गरियाबंद जिल्ह्यातील कारवाईत ठार झाले होते. यंदाच्या कारवायांनीही राज्यातील नक्षलविरोधी लढा अधिक निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: UIDAI Hackathon 2026: UIDAI कडून दोन लाख रुपये जिंकण्याची संधी, काय आहे नविन उपक्रम?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version