अमेरिका: जगातील सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञान कंपनी Apple पुढील वर्षी आपल्या iPhone मालिकेत मोठा बदल करणार आहे. दरवर्षी चार नवे iPhone लॉन्च करणारी ही कंपनी आता 2026 मध्ये iPhone Air 2 हे मॉडेल बाजारात आणणार नाही. त्याऐवजी Apple फक्त तीन नवीन फोन सादर करणार आहे iPhone Fold, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max. The Information या संकेतस्थळाच्या अहवालानुसार, Apple ने iPhone Air 2 वरील कामकाज थांबवले आहे. या फोनचे उत्पादन या महिन्याअखेर बंद होणार असून, Foxconn आणि Luxshare यांनी आधीच असेंब्ली थांबवली आहे. या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे पहिल्या iPhone Air ची विक्री निराशाजनक ठरली. हलका आणि कमी किंमतीचा फोन म्हणून सादर केलेला हा मॉडेल ग्राहकांना फारसा आवडला नाही.
गेल्या काही वर्षांत Apple ने आपल्या मुख्य मालिकेसोबत चौथ्या मॉडेलचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. iPhone Mini आणि iPhone Plus सारख्या मॉडेल्सनाही फारसे यश मिळाले नव्हते. Air Series ही त्या समस्येचे समाधान ठरेल, अशी अपेक्षा होती. पण विक्री कमी झाल्याने कंपनीने आता फक्त आपल्या Pro Series वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, iPhone Air 2 पुन्हा 2027 मध्ये परत येण्याची शक्यता आहे. त्या वेळी त्यामध्ये नवीन डिझाइन आणि काही वेगळे फीचर्स असतील, असा अंदाज आहे. दरम्यान, iPhone 18 Pro Series बद्दल बाजारात उत्सुकता वाढली आहे. नवीन फोनमध्ये बाह्य रचना जवळपास तशीच राहील, पण Ceramic Shield डिझाइनमध्ये थोडे बदल केले जातील. या मॉडेल्समध्ये 6.3 इंच (Pro) आणि 6.9 इंच (Pro Max) अशा स्क्रीन साइज कायम राहतील. आतमध्ये A20 Pro Chip बसवली जाईल, जी अधिक कार्यक्षम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हाताळण्यात सक्षम असेल.
Apple स्वतःचा C2 Modem विकसित करत आहे, जो Qualcomm च्या चिपऐवजी वापरला जाईल. यामुळे 5G नेटवर्कचा वेग वाढेल आणि बॅटरी अधिक काळ टिकेल. याचबरोबर, कॅमेऱ्यातही मोठा बदल अपेक्षित आहे. यावेळी Sony ऐवजी Samsung कंपनीकडून नवीन Three layer Camera Sensor वापरण्यात येईल, ज्यामुळे प्रकाश आणि रंग नियंत्रण अधिक अचूक होईल. फोटोग्राफी प्रेमींसाठी Apple एक नवीन Variable Aperture Lens देखील देऊ शकते, ज्यामुळे वापरकर्त्यांना प्रकाश आणि डेप्थ स्वतः नियंत्रित करता येईल. तसेच, कंपनी Satellite Internet Connectivity वाढवण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे दुर्गम भागातही इंटरनेट वापरणे शक्य होईल. शेवटी, Camera Control Button मध्ये बदल करून ते अधिक साधं आणि मजबूत बनवण्याची तयारी कंपनी करत आहे. यामुळे उत्पादन प्रक्रिया सोपी होईल आणि खर्चही कमी होईल.
या नव्या बदलांसह Apple पुढील वर्षी तंत्रज्ञान विश्वात पुन्हा एकदा नवे मापदंड ठरवणार आहे. iPhone Air 2 रद्द करण्याचा निर्णय कंपनीसाठी धोरणात्मक बदल ठरू शकतो, तर iPhone 18 Series नवीन डिझाइन, चिप आणि कॅमेऱ्यामुळे ग्राहकांसाठी एक मोठा अपग्रेड ठरण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.