बंगळुरू, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन वीस षटकांच्या सामन्यांची मालिका भारताने ३ – ० अशी जिंकली. बंगळुरूत भारताने विजय मिळवला आणि कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. तो वीस षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ५४ पैकी ४२ वीस षटकांचे सामने जिंकले. नोंदींनुसार वीस षटकांच्या क्रिकेटमधील भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने ७२ पैकी ४१ वीस षटकांचे सामने जिंकले आहेत.
बंगळुरूत रोहितची नाबाद शतकी खेळी
अफगाणिस्तान विरुद्धच्या बंगळुरूतील वीस षटकांच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाबाद शतकी खेळी केली. त्याने ६९ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या. रोहितच्या खेळीत आठ षटकार आणि अकरा चौकारांचा समावेश होता. रोहितला रिंकू सिंगने उत्तम साथ दिली. रिंकूने ३९ चेंडूत नाबाद ६९ धावा करताना सहा षटकार आणि दोन चौकार मारले.
बंगळुरू टी २० (तिसरा सामना) : भारताचा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय
नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय
भारत : २० षटकांत चार बाद २१२ धावा
अफगाणिस्तान : २० षटकांत सहा बाद २१२ धावा
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बरोबरी
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय
सामनावीर : रोहित शर्मा
मालिकावीर : शिवम दुबे
इंदूर टी २० (दुसरा सामना) : भारताचा सहा गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
अफगाणिस्तान : २० षटकांत सर्वबाद १७२ धावा
भारत : १५.४ षटकांत चार बाद १७३ धावा
सामनावीर : अक्षर पटेल
मोहाली टी २० (पहिला सामना) : भारताचा सहा गडी राखून विजय
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय
अफगाणिस्तान : २० षटकांत पाच बाद १५८ धावा
भारत : १७.३ षटकांत चार बाद १५९ धावा
सामनावीर : शिवम दुबे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.