मुंबई: राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत असून, शेवटच्या दिवशी सभागृहात राजकीय तापमान चांगलेच वाढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन मांडत असताना विरोधकांनी विदर्भाच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण झाले. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या विकासदृष्टी, महत्त्वाच्या योजना आणि घेतलेल्या निर्णयांवर ठामपणे भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चंद्र आणि सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील.” यासोबतच त्यांनी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय जाहीर करत सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट करण्यात आल्याची माहिती दिली. हा निर्णय राज्याच्या इतिहास आणि संस्कृतीच्या जतनासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: माझा असा फोटो काढा…! शेवटच्या दिवशी अधिवेशनातील मजेशीर क्षण, नेतेमंडळींचा Video Viral
निवडणुका झाल्यानंतर सरकारी योजना बंद होतील, या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका मांडली. राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना या बंद केलेल्या नसून, सर्व योजना सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पाच वर्षेही या योजना अखंडपणे सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे अंतिम आठवड्यातील भाषण सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांनी पुन्हा गदारोळ केला. यामुळे संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून सभागृहातील शिस्तीबाबत खडसावून सांगितले. “तुम्ही पहिल्यांदाच निवडून आलेले आहात. तुम्हाला या सभागृहाची शिस्त आणि नियम माहिती नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.
राज्याच्या दीर्घकालीन विकासाबाबत बोलताना फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट’ची माहिती सभागृहासमोर ठेवली. या दस्तऐवजात 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र कसा असेल, याचा सविस्तर आराखडा प्रत्येक विभागासाठी तयार करण्यात आला आहे. 2030, 2035 आणि 2047 असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले असून, 2029–2030 पर्यंत महाराष्ट्र देशातील पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या दिशेने सरकारचे काम सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलत असताना एक ठरावीक शिस्त पाळली जाते. मागील काळात विदर्भाला काय मिळाले आणि आता काय मिळाले, याची तुलना सुरू केली तर काहींना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. गदारोळ वाढतच राहिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत दोन वेळा विरोधी आमदारांना खाली बसण्यास सांगून अशा पद्धतीने कामकाज चालू शकत नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी गोंधळाच्या वातावरणातच हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला, मात्र शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष ठळकपणे समोर आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.