Ajit Pawar : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणा’च्या चर्चेवर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले आहे. ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार ही निव्वळ अफवा आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. पुण्यात प्रचाराच्या सांगता सभेत आणि रोड शो दरम्यान त्यांनी हे मोठे विधान केले.
सुप्रिया सुळेंबाबत स्पष्ट भूमिका
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी स्थानिक पातळीवर हातमिळवणी केल्यानंतर विलिनीकरणाचे संकेत दिले जात होते. मात्र, त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, “सुप्रिया सुळे यांचा पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे, त्यामुळे त्या केंद्रात मंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच पक्षांच्या विलिनीकरणाच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.”
भाजपच्या टीकेला सडेतोड उत्तर
‘मैत्रीपूर्ण लढती’चा शब्द अजित पवारांनी पाळला नाही, या भाजपच्या आरोपावर त्यांनी खोचक उत्तर दिले. “जेव्हा मी निवडणुकीच्या मैदानात ताकदीने उतरतो, तेव्हा ती लढत ‘मैत्रीपूर्ण’ कशी असू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुण्यात भाजपला आपली सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यानेच ते आमच्यावर टीका करत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हफ्ता का नाही झाला?; चित्रा वाघ यांनी सांगितलं नेमकं कारण
बाजीराव पेशव्यांचा संदर्भ आणि मुख्यमंत्र्यांना टोला
दरम्यान, पुण्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या ‘मोफत’ घोषणांवरून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, काही लोक म्हणतात की मी बाजीराव म्हणवून घेतोय. पण लक्षात ठेवा, पहिले बाजीराव पेशवे हे कर्तृत्ववान होते, त्यांनी मनगटाच्या जोरावर साम्राज्य चालवले. मुख्यमंत्र्यांनी मतदारांना ‘कमळ’ दाबण्याचे आवाहन केले होते, त्यावर पलटवार करताना अजित पवार म्हणाले, 15 तारखेला सकाळी लवकर उठा, अलार्म बंद करा, पण मतदान केंद्रावर गेल्यावर फक्त घड्याळाचेच बटण दाबा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.