धाराशिव : मुंबई : राज्यात राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू असून शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर जोर धरत आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिवसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत खासदार म्हणून ओमराजे निंबाळकरांची ओळख आहे. मात्र ठाकरे शिवसेनेचे सहा खासदार शिवसेनेमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू असताना निंबाळकर यांचेही नाव त्या खासदारांमध्ये घेतले जात आहे. सध्या ठाकरे शिवसेनेचे काही खासदार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. त्यापैकी उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क केला असता ते पुण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. जर खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत असतील तर उद्धव ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धन वाडी येथील घरासमोरून जय महाराष्ट्रचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील यांनी आढावा घेतला आहे.
शिवसेना प्रवेशाबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचा तूर्तास कोणताही अधिकृत निर्णय अद्याप समोर आलेला नाही. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या निकालानंतर पुढील राजकीय दिशा ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. हत्याकांडाच्या निकालाची तारीख लांबल्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. ओमराजे निंबाळकर यांचा पुढील निर्णय न्यायालयाच्या निकालावरच अवलंबून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर जो काही निर्णय घेतील तो आम्हा गावकऱ्यांना मान्य असणार आहे आणि आम्ही गावकरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेत पक्ष प्रवेश करायला खूप उशीर झाला. त्यांनी अगोदरच जायला हवं होतं, असा ग्रामस्थांचा काहीसा सूर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.