State Women's Commission: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि 'कॅप्टन' अशोक खरात याच्या वादग्रस्त कृत्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आणि शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर, खरातसोबतच्या जवळीकीमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला. चाकणकर पायउतार झाल्यानंतर आता या महत्त्वाच्या घटनात्मक पदाचा पदभार कोणाकडे सोपवला जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पदासाठी आता नवीन नावांची चाचपणी सुरू झाली असून राजकीय वर्तुळात दोन नावे आघाडीवर आहेत.
पुण्यातून आणि उत्तर महाराष्ट्रातून नावे चर्चेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आयोगाचे अध्यक्षपद महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडेच (अजित पवार गट) राहण्याचे संकेत मिळत आहेत. रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विश्वासू सहकारी होत्या, त्यामुळे पक्षांतर्गत समीकरणे पाहता हे पद पुन्हा याच पक्षाला मिळण्याची दाट शक्यता आहे. या शर्यतीत सध्या पुण्यातील आक्रमक नेत्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी चेहरा असलेल्या प्रतिशा शिंदे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षनेतृत्व या दोन्ही नावांच्या ताकदीचा आणि अनुभवाचा विचार करत असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
निवडीपुढील आव्हाने आणि राजकीय पेच
महिला आयोगाचे अध्यक्षपद हे केवळ राजकीय पुनर्वसनाचे साधन नसावे, अशी मागणी सामाजिक स्तरातून होत असताना नवीन अध्यक्षांची निवड करणे सरकारसाठी कसोटीचे ठरणार आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आयोगाच्या प्रतिमेला जो तडा गेला आहे, तो पुसून काढू शकणाऱ्या आणि महिलांच्या प्रश्नांवर प्रगल्भपणे काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. वैशाली नागवडे यांचा पुण्यातील दांडगा जनसंपर्क आणि प्रतिशा शिंदे यांची उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी, या दोन्ही जमेच्या बाजू असल्या तरी अंतिम निवडीबाबत अद्याप कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
पुढील निर्णय आणि राज्याचे लक्ष
चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महायुती सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. ही निवड केवळ प्रादेशिक समतोल राखण्यासाठी असेल की महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस काम करणारी असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्यातरी नागवडे आणि शिंदे या दोन नावांभोवतीच राष्ट्रवादीची फिल्डिंग लागलेली दिसत असली, तरी ऐनवेळी एखादे तिसरेच नाव समोर येते का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे डोळे लागले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.