मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेचा सारीपाट आता विधान परिषदेच्या नऊ जागांभोवती फिरू लागला आहे. येत्या 12 मे 2026 रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विशेषतः महाविकास आघाडीमध्ये (मविआ) उमेदवाराच्या निवडीवरून मोठा पेच निर्माण झाला असून, सर्व नजरा आता 'मातोश्री'च्या निर्णयाकडे लागल्या आहेत. मित्रपक्षांच्या आग्रहामुळे ही निवडणूक आता केवळ आकड्यांची राहिली नसून, ती प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुद्द उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढवावी, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या दोन्ही मित्रपक्षांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची चर्चा असली, तरी 'मविआ'चे अस्तित्व आणि नेतृत्वाचा प्रभाव टिकवण्यासाठी त्यांनीच विधान परिषदेत जावे, असा दबाव वरिष्ठ स्तरावरून टाकला जात आहे. ठाकरे गटाचे नेतेही आपल्या पक्षप्रमुखांचे मन वळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मात्र, जर उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावर अंतिम नकार दिला, तर ठाकरे गटातून अनेक नावांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आक्रमक नेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्येही बाळासाहेब थोरात, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि राजेश राठोड यांच्या नावांची चर्चा असून, शेवटच्या क्षणी मविआ कोणाला संधी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसरीकडे, महायुतीचे पारडे संख्याबळानुसार सध्यातरी जड दिसत आहे. विधानसभेतील सध्याच्या गणितानुसार, एका उमेदवाराला विजयासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. यानुसार महायुतीला 8 जागा, तर मविआला 1 जागा सहज मिळताना दिसत आहे. भाजपने त्यांच्या 6 जागांसाठी राम सातपुते, संदीप जोशी, केशव उपाध्ये, माधवी नाईक आणि रणजितसिंह निंबाळकर यांसारख्या चेहऱ्यांची चर्चा सुरू केली आहे. भाजपकडून पुन्हा एकदा जुन्या कार्यकर्त्यांना संधी देऊन किंवा ऐनवेळी नवीन नावे समोर आणूननवी खेळी वापरली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 48 तासांचा अवधी शिल्लक आहे. या काळात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंना निवडणुकीसाठी तयार करण्यात यशस्वी होतात की, एखादा अनपेक्षित चेहरा समोर येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी महायुती आपली ताकद कशी टिकवते आणि विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने एकीचे बळ कसे दाखवतात, यावर आगामी विधानसभेची दिशा अवलंबून असणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.