Uddhav-Raj Thackeray Interview : ‘मुंबईची भाषा हिंदी-गुजराती म्हणणं म्हणजे आमची संस्कृती संपवण्याचा डाव’; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून अनेक गोष्टी करून घेतल्या जात असल्याने हा धोका अधिक गंभीर वाटतो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Uddhav-Raj Thackeray Interview : ‘मुंबईची भाषा हिंदी-गुजराती म्हणणं म्हणजे आमची संस्कृती संपवण्याचा डाव’; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असतानाच, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित मुलाखत सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही परखड मुलाखत मराठी अभिनेते महेश मांजरेकर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी घेतली. या संवादात मुंबई, मराठी अस्मिता, परप्रांतीय प्रश्न, सत्ता आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या निर्णयांवर तीव्र मतप्रदर्शन करण्यात आले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही. पण इथे येऊन जर कोणी सक्ती करत असेल की मुंबईची भाषा गुजराती आहे, हिंदी आहे, तर याचा अर्थ आमची संपूर्ण संस्कृती आणि अस्मिता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. फक्त नावाला मुंबई ठेवून तिचा आत्माच मारण्याला काहीही अर्थ नाही.” सत्तेत बसलेले लोक “बस म्हटलं की बस, उठ म्हटलं की उठ” अशा पद्धतीने वागतात, अशांवर जनतेने कसा विश्वास ठेवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी मराठी माणसाच्या भूमिकेवर भाष्य करताना म्हटले की, “मराठी माणूस लढवय्या आहे, कष्ट करणारा आहे. पण मुंबईची लक्ष्मी आणि संपत्ती हळूहळू इतर परप्रांतीयांच्या हाती गेली आहे.” पुढे ते म्हणाले की, “मुंबईतील जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील आणि संपत्तीचा वाटा गुजरातकडे जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”

हेही वाचा: Uddhav-Raj Thackeray Interview: “…त्यावेळेस मोदींना वाचवणारे बाळासाहेब ठाकरे होते” मराठी-हिंदू विषयावरून उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

या विधानावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी अधिक तीव्र भूमिका मांडली. ते म्हणाले, “आताची परिस्थिती एवढ्यावर थांबलेली नाही. आता त्यांना केवळ संपत्तीच नाही, तर मुंबईचा भूभागही हवा आहे. मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात मुंबई मागण्याचा जो प्रयत्न झाला होता, तोच प्रयत्न आता नव्या पद्धतीने होत आहे. तेव्हा पाच लोक होते, आज ते पाचशे झाले आहेत.”

केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून अनेक गोष्टी करून घेतल्या जात असल्याने हा धोका अधिक गंभीर वाटतो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी पायाभूत सुविधा आणि विमानतळाच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केला. “मुंबई आणि नवी मुंबईमध्ये आधीच विमानतळ असताना, नवीन विमानतळाची गरज काय? हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईकडे वळवण्याचा डाव दिसतो आहे,” असे ते म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “सध्याच्या मुंबई विमानतळाचे क्षेत्रफळ इतके मोठे आहे की किमान 50 शिवाजी पार्क तिथे बसू शकतील. एवढे प्रचंड क्षेत्र आज सगळे अदानी समूह यांच्या ताब्यात आहे. म्हणजे विमानतळ नवी मुंबईकडे वळवायचा आणि मुंबईतील हा मोक्याचा भूभाग विकायला काढायचा, असा हा सगळा प्रकार आहे.”

यावर संजय राऊत यांनी “मोदी – शाह सत्तेत आल्यानंतरच हे सगळं घडायला लागलं का?” असा थेट प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “हो, त्याच्यानंतरच या घडामोडींना वेग आला आहे.”

एकूणच, या मुलाखतीतून ठाकरे बंधूंनी आणि संजय राऊत यांनी मुंबईची अस्मिता, मराठी माणसाचे हक्क आणि सत्तेच्या निर्णयांमागील हेतूंवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद केवळ राजकीय नाही, तर मुंबईच्या भवितव्याशी जोडलेला असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.

हेही वाचा: Uddhav-Raj Thackeray Interview: “त्यांच्या हातात काही नाही, वर जे दोघे…” मुंबई वेगळी न करण्याच्या फडणवीसांच्या मतावर राज ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version