Accident News: दिल्लीतील सुलतानपुरी परिसरात एका हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नविन आयफोन खरेदी केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तीन तरुण मित्रांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक, मयांक आणि प्रतीक हे तिघेही जिवलग मित्र सुलतानपुरीतील कृष्ण विहार परिसरात राहत होते. दीपकने काही दिवसांपूर्वी नवीन आयफोन खरेदी केला होता. या आनंदात मित्रांना पार्टी देण्याचा त्याचा बेत होता. मंगळवारी रात्री तिघेही स्कूटरवरून हरियाणातील सोनीपत येथील मुरथल येथे पराठे खाण्यासाठी निघाले होते. मात्र हा आनंदाचा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील नांगल खुर्द पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा एका भरधाव ट्रकला भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की स्कूटरचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. हे तिन्ही मित्र 20 ते 23 वयोगटातील असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे समोर आले आहे. तसेच, मृत तरुणांपैकी कोणालाही हेल्मेट घातलेले नव्हते, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.
या अपघातामुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयांकचे वडील दिल्लीमध्ये व्यापारी असून मयांक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अन्य एका तरुणाचाही तो एकमेव मुलगा असल्याचे समजते. तिघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते, एकत्र शिक्षण घेत होते आणि कायम सोबतच असायचे.
गावात एकाच वेळी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या या तरुणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.