पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी विद्युत वाहने अर्थात इलेक्ट्रिकल व्हेईकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून मुंबईतील आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) समवेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने करार केला आहे. महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार तसेच एचपीसीएल च्या वतीने कार्यकारी संचालक श्री. संदीप माहेश्वरी यांनी कराराचे आदानप्रदान केले.
प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संतुलनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विद्युत वाहनांच्या वापरांना प्रोत्साहन दिले जात आहे. या धोरण अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांनादेखील प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामध्ये योगदान म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत ठिकठिकाणी विद्युत वाहने ऊर्जा भारीत अर्थात चार्जिंग करण्याची सुविधा उभारणीला बळकटी दिली आहे. विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये देखील इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जात आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या वतीने महानगरपालिकेच्या दहा वाहनतळांमध्ये चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जाणार आहे. त्याबाबतच्या करारावर महानगरपालिका मुख्यालयात समिती सभागृहातBदिनांक २९ मार्च २०२३ छोटेखानी समारंभात स्वाक्षरी करण्यात आली.
या करारावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी तर एचपीसीएलच्या वतीने व्यवसाय विकास विभागाचे कार्यकारी संचालक श्री. संदीप माहेश्वरी, मुख्य महाव्यवस्थापक श्री. देबाशिष चक्रवर्ती यांनी स्वाक्षरी केली. महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) श्री. अतुल पाटील, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. एम. एम. पटेल, उपप्रमुख अभियंता श्री. विवेक कल्याणकर, सहायक आयुक्त श्री. विनायक विसपुते, सहायक आयुक्त श्री. मनीष वळंजू, एचपीसीएलचे व्यवसाय विकास महाव्यवस्थापक श्री. अनंत मोहापात्रा, वायू इंधन विभागाचे श्री. अतुल गोयल, प्रशिक्षण विभागाचे महाव्यस्थापक श्री. शुभांकर दत्ता, मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या उपव्यवस्थापक श्रीमती रचना रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या करारानुसार, महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये एचपीसीएल यांना चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी जागा पुरवली जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रारंभीची वर्षे भाडे आकारणार नाही. तथापि, एचपीसीएलच्या वतीने प्रति वीज युनिट एक रुपया दराने महानगरपालिकेला रक्कम देण्यात येईल. तसेच या चार्जिंग स्टेशनवर विद्युत वाहने चार्जिंसाठी एचपीसीएलकडून वाजवी दर आकारले जाणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर सरासरी दोन पॉईट पुरवले जाणार आहेत, म्हणजेच दोन वाहने चार्ज करता येतील. वाहनतळांची ठिकाणे, त्यांच्या गरजा यानुसार या सर्व बाबींना अंतिम रुप दिले जाणार आहे.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार, २०३० पासून भारतात विक्री केली जाणारी प्रत्येक मोटारकार इलेक्ट्रिक असेल. इलेक्ट्रिक कार जीवाश्म इंधनाऐवजी पर्यायी इंधन म्हणून वीज वापरते. पारंपरिक वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केल्यास प्रतिवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर किमतीच्या जीवाश्म इंधनाची बचत होऊ शकते.
१) एच. पी. पेट्रोल पंपाजवळील रुणवाल अँथोरियम, लालबहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (पश्चिम)
२) डॉ. आनंदराव नायर मार्ग, जेकब सर्कल, भायखळा
३) सी. एस. क्रमांक ६३ (पीटी) व ६४, अपोलो मील कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ
४). कल्पतरू एव्हाना इमारत , जनरल नागेश मार्ग, एम.जी. एम. हॉस्पिटलजवळ, परळ-शिवडी
५) भूखंड क्रमांक ११/१२४ (अंशतः) व १२/१३४(अंशतः) मिळून सलग भूखंड, ग. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, एफ/दक्षिण
६) हिल रोड व आइस फॅक्टरी लेन यांच्या जंक्शनवर, वांद्रे (पश्चिम)
७) वसंत ओऍसिसजवळ, मरोळ गांव, अंधेर (पूर्व)
८) पहाडी गोरेगावच्या भूखंडावरील बहुमजली सार्वजनिक वाहनतळ, उमिया माता मंदिरामागे, विश्वेश्वर मार्ग, गोरेगाव (पूर्व)
९) पहाडी गोरेगाव, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (टोपीवाला मार्केट इमारत, गोरेगाव रेल्वे स्थानक (पश्चिम) जवळ, पी/दक्षिण विभाग)
१०) एकसार गाव, देविदास गल्ली, (क्लब एक्वारिया), बोरिवली (पश्चिम), आर/उत्तर विभाग
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.