बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे चक्क वाहतूक पोलिसांनी बुजवले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी परिसरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो, या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नेहमीच एमआयडीसी टर्निंगवर या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ येतात. या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरत असणारे या महामार्गावरील खड्डे आता वाहतूक पोलिसांनी बुजवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग गाढ झोपेत असलयाचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील पडलेले खड्डे वाहतूक पोलिसांनी बुजवावे यापेक्षा वेगळी नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला दुसरी काय असू शकते? अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून आता उमटू लागली आहे. तब्बल दहा ते पंधरा खड्डे या वाहतूक पोलिसांनी स्वतःहून डांबर आणून या ठिकाणी बुजवले आहेत. त्यामुळे या वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पावसामुळे खामगावातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघाताच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. हे सर्व टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच खड्डे बुजवले असल्याचे समोर आले आहे. खामगांवच्या वाहतूक पोलिसांनी हातात फावडे घेऊन खामगाव- नांदुरा रोड वरील खड्डे बुजविले आहेत. त्यांच्या या खड्डे बुजविण्याच्या उपक्रमाचे नागरिकांकडून काैतुक केले जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव- नांदुरा रोड वरील एमआयडीसी टर्निंग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. नांदुराकडून येणाऱ्या तसेच खामगावकडून नांदुराकडे जाणाऱ्या वाहनांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मोठे पडले आहेत. बांधकाम विभागाने हे खड्डे भरणे आवश्यक होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना खड्ड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याच खड्ड्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम कामानिमित्त घरातून बाहेर पडणाऱ्यांना होत आहे. खड्ड्यामुळे पाणी साचून राहण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.