Raksha Khadse On Muktainagar Election Results: उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मुक्ताईनगरमध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा हादरा बसला असून, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) संजना पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. संजना पाटील या स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या असून त्यांनी 2,000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.
रक्षा खडसेंनी स्वीकारली पराभवाची जबाबदारी
मुक्ताईनगरमधील या दारुण पराभवानंतर रक्षा खडसे यांनी नम्रपणे निकालाचा स्वीकार केला आहे. ‘मी या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी घेतली होती, त्यामुळे हा पराभवही माझाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावेळी त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर ‘दडपशाही’चा गंभीर आरोप केला. निकालावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, ‘इथल्या आमदारांची गुंडशाही आणि दडपशाही आजही कायम आहे, मी माझ्या या आरोपावर ठाम आहे. त्यांनी आता लोकांना त्रास न देता चांगले काम करावे.’ जरी नगराध्यक्षपद हातून गेले असले तरी, 17 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. शून्य असलेल्या जागी पक्षाने ही एक नवीन सुरुवात केली असून भविष्यात संघटना अधिक मजबूत करू, असा विश्वासही यावेळी रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
केवळ मुक्ताईनगरच नव्हे, तर जळगाव जिल्ह्यात महायुतीमधील मंत्र्यांना जनतेने अनपेक्षित धक्के दिले आहेत. मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या नेतृत्वात भाजपचा पराभव झाला असून शिवसेनेचा (शिंदे गट) विजयी झाला आहे. तथापी, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात ठाकरे गटाच्या लिलाबाई चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.