महाड तालुक्यातील ढालकाठी बोरगाव परीसरात एका आईने आपल्या पोटच्या पाच मुली आणि एका मुलाला विहिरीत ढकलून ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून याला अद्याप तपास यंत्रणांनी दुजोरा दिलेला नाही.
रुना चिखुरी सहानी वय ३० असे या महिलेचे नाव आहे. तर, रोशनी वय १०, करिष्मा वय ८, रेश्मा वय ६, विद्या वय ५, शिवराज वय ३ आणि राधा वय दिड वर्ष अशी मृत मुलांची नावे आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असून आरोपी महिला रुना आणि पती चिखुरी हे दोघे महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रियेकरता मुलांचे मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
संध्याकाळच्या सुमारास स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी रुनाला विहीरीत उडी मारताना पाहिलं. त्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. तिला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. ‘मी माझ्या सहा लहान मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला,’ या महिलेचे शब्द ऐकून स्थानिकांनाही धक्का बसला. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून शोधमोहीम सुरू केली. रात्री दहाच्या सुमारास विहिरीतून सहा लहान मुलांना बाहेर काढण्यात आलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडाल्यामुळे सहा जीवांचा मृत्यू झाला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.