Vidhan Parishad Election 2026: मविआ’मध्ये माघारसत्र! "विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच स्वतःचा भाव ठरवतात" राऊतांच्या आरोपाने खळबळ

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी 18 जूनला मतदान होणार आहे. त्यापूर्वी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली आहे.
Vidhan Parishad Election 2026: मविआ’मध्ये माघारसत्र! "विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच स्वतःचा भाव ठरवतात" राऊतांच्या आरोपाने खळबळ

राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी 18 जूनला मतदान होणार आहे. त्यापूर्वी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम मुदत गुरुवारी 4 जून ही होती. मात्र, या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. तसेच ऐनवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवारानेच माघार घेतल्यानं मोठी नामुष्की ओढावल्याचंही दिसून आलं. काल मविआमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला एकामागे एक मोठा धक्का बसला आहे. तब्बल तीन महत्त्वाच्या जागेवरून अधिकृत उमेदवाराने ऐनवेळी निवडणुकीतून अर्ज मागे घेत काढता पाय घेतला. तर या धक्कादायक बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने कठोर पावले उचलत, पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल सर्व बंडखोर उमेदवारांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी केली. यावेळी माघार नाट्यानंतर 17 पैकी 5 जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय झाला असून 12 जागांवर आता प्रत्यक्ष लढत होणार आहे. 

हेही वाचा- NCP Rajya Sabha Seat : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा भाजपकडे जाणार? नवनीत राणांच्या नावाची जोरदार चर्चा
याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “विधानपरिषद निवडणूक: काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे. कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत.”

राज्यात कुठे कुठे बंडखोरी?

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दरम्यान, कोकण विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाळ माने यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न केला. यानंतर कृष्णा डोणगावकर व देवयानी डोणगावकर (छत्रपती संभाजी नगर) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, डोणगावकरांनी अचानक माघार घेतली असली तरी ठाकरे गटाने कमालीच्या सावधगिरीने खेळलेल्या ‘बॅकअप प्लान’मुळे महाविकास आघाडीची अब्रू वाचली. आता छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी गणेश लोखंडे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असतील, असे जाहीर करण्यात आले आहे. 

पुणे विधान परिषद निवडणुकीतून आधीच सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद यांनी माघार घेतल्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीच्या काही मिनिटे आधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

ठाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे, ठाण्यात दुरंगी लढत होत असताना रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली. ठाणे-पालघर विधानपरिषदेत मविआच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्यामुळे शिंदेंचा रस्ता मोकळा झाला आहे. शिंदेंच्या शिलेदाराने बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे हा मविआसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप महायुतीचे उमेदवार अरुण लखानी यांचा विजय निश्चित झाला आहे. 

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या समन्वयाच्या भूमिकेमुळे विविध पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे, भाजपचे नितीन भुतडा, अपक्ष सय्यद फारुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या प्रक्रियेनंतर जिल्ह्यात ‘संजय राठोड पॅटर्न’ची चर्चा सुरू असून, सर्वपक्षीय समन्वयाचा हा विजय मानला जात आहे.

हेही वाचा- Devyani Dongaonkar : उमेदवारी अर्ज मागे घेणं पडलं भारी, देवयानी डोणगावकरांची शिवसेनेतून हकालपट्टी; संजय राऊतांची पोस्ट शेअर

राज्यातील 12 मतदारसंघात आमन-सामने कोण?
1. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध  वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) 
2. अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
3. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध  शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
4. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
5. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस) 
6. भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा)  विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
7. नाशिक :  गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध  नरेंद्र दराडे  (शिवसेना)
8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा  (वंचित )
9. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष) 
11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)
12. नागपूर (पोटनिवडणूक) :  डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version