राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच ऑक्टोबरमध्ये मुंबईत कोरोना रुग्णांचा सर्वात कमी मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून ऑक्टोबर महिना मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे.
दिवाळी काही दिवसांवर आलेली असताना ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेर पर्यंत मुंबईत ११,३०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या महिन्यात १०९ कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यात मुंबईत सर्वात कमी मृत्यूदर नोंदवला असल्यामुळे मुंबईकर बेफिकीर झाल्याचे चित्र आहे. मृत्यूदर कमी झाला असला तरी मात्र कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. मुंबईकरांनी सतत मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.