मुंबई: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या वेगळे असलेले 'ठाकरे बंधू' म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अखेर एकाच मंचावर येवून युतीची घोषणा नुकतीच केली आहे.
मात्र, एकीकडे ठाकरे घराणे एकत्र येत असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेना (UBT) यांच्यातील युतीची चर्चा फिस्कटल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत झालेली बैठक निष्फळ ठरली. कुर्ला, विक्रोळी आणि धारावी यांसारख्या विभागांतील जागांवरून दोन्ही पक्षांत मोठा पेच निर्माण झाला आहे. 2017 मध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते, त्या जागा सोडण्यास ठाकरे गटाने स्पष्ट नकार दिला आहे.
शरद पवार यांच्या पक्षाने 30 जागांचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र ठाकरे गटाने केवळ 15 ते 20 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. अपेक्षित जागा मिळत नसल्याने आता राष्ट्रवादीने आपला प्रस्ताव काँग्रेसकडे सोपवला असून, ते ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता धूसर आहे.
मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांनी जागावाटपाचा एक विशेष फॉर्म्युला निश्चित केला आहे. यानुसार, शिवसेना (ठाकरे गट) 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 60 ते 70 जागांचा वाटा दिला जाण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रवादी (शरद पवार गट) या युतीसोबत आला, तर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून 15 ते 20 जागा दिल्या जातील. मात्र, जागांच्या ओढाताणीमुळे हे समीकरण आता कठीण दिसत आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीमुळे मुंबईच्या राजकारणात नवे चैतन्य आले असले तरी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी निर्माण झालेला जागावाटपाचा पेच महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे करतो. जर जागावाटपाचा तोडगा निघाला नाही, तर मुंबईत 'ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदे-अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी' असा त्रिकोणी संघर्ष अटळ आहे. आता यातूनच मुंबईच्या सत्तेची आणि राज्याच्या आगामी राजकारणाची नवी दिशा स्पष्ट होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.