राज्यात दोन ते तीन दिवसांत तपमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात ५ ते ७ एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तपमानात गेल्या आठवडय़ात मोठी वाढ झाली होती. उत्तरेकडील काही राज्ये आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. राज्यात कोकण विभागापाठोपाठ विदर्भातही उष्णतेची लाट आली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तपमानाचा पारा ४० अंशांपर्यंत गेला होता. सध्या दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून तपमानात काही प्रमाणात घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतरत्र तपमान सरासरीच्या जवळ आणि ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. कोकण विभागातही बहुतांश ठिकाणी तपमान कमी झाले आहे.विदर्भात मात्र सर्वत्र ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तपमान आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दोन दिवसांनंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, ५ ते ७ एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही याच दरम्यान तपमानाचा पारा २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.