मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत वेगळा राजकीय निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला असून, आज त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय त्यांनी घेतला असला तरी प्रामाणिकतेशी कोणतीही तडजोड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर व्यक्त करताना लिहले आहे "प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो, आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे… शब्द अपुरे पडत आहेत… पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला."
भावनिक रित्या व्यक्त होत त्यांनी लिहले की, "सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर – बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं….. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे."
पुढे त्या लिहतात "आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो, अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन.
फेसबुक पोस्ट मध्ये लिहताना तेजस्वी घोसाळकर यांनी लिहले की, "आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना."
एकूणच तेजस्वी घोसाळकर यांच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल निर्माण झाली आहे. भावनिक पोस्टमधून त्यांनी घेतलेल्या वेदनादायी निर्णयाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता पुढे केली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात दहिसर–बोरिवली परिसरातील राजकारणाची दिशा कशी बदलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: BMC Election 2025: महायुतीत जागावाटपाचा तिढा; भाजप-शिवसेना समन्वय समितीची निर्णायक बैठक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.