Chhatrapati Sambhajinagar: ENT विभागाने केली अत्यंत कठीण शस्त्रक्रिया; श्वसननलिकेतील पिन काढण्यात डॉक्टरांना यश

छत्रपती संभाजीनगरातील 16 वर्षांच्या तरुणीच्या श्वसनमार्गात गळ्यातील पिन अडकली; तातडीच्या शस्त्रक्रियेत ENT डॉक्टरांनी यशस्वीरित्या पिन काढली, रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे.
Chhatrapati Sambhajinagar: ENT विभागाने केली अत्यंत कठीण शस्त्रक्रिया; श्वसननलिकेतील पिन काढण्यात डॉक्टरांना यश

विजय चिडे, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर: गणेश कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी मिर्झा नबीला, वय 16 वर्षे (बदललेले नाव), गळ्यातील स्कार्फ व्यवस्थित करत असताना तोंडात धरलेली पिन (सेफ्टी पिन) चुकून श्वसनमार्गात गेले, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पिन श्वसनमार्गात गेल्यानंतर तिला खोकला आणि छातीत तीव्र वेदना यांचा त्रास सुरू झाला. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आवश्यक खबरदारी म्हणून रात्री 10 वाजल्यापासून तिला काहीही खाणे-पिणे देण्यात आले नव्हते. करण्यात आलेल्या छातीच्या एक्स-रे तपासणीत डाव्या मुख्य श्वासनलिकेत (Left main bronchus) रेडिओ-अपेक परकीय वस्तू अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. ही अवस्था अत्यंत धोकादायक असल्यामुळे कान-नाक-घसा विभागाने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक ब्रॉन्कोस्कोपीद्वारे स्कार्फ पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होती. सदर शस्त्रक्रिया माननीय डीन डॉ. सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

या शस्त्रक्रियेत विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्यासह वरिष्ठ निवासी डॉ. गिरिजा जालनापुरकर तसेच कनिष्ठ निवासी डॉ. कल्याणी, डॉ. उत्कर्ष, डॉ. ऋषिकेश, डॉ. ऋतुजा आणि डॉ. तुषार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शस्त्रक्रियेदरम्यान अ‍ॅनेस्थेसिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गणेश निकम आणि व्याख्याता डॉ. किरण यांनी अत्यंत दक्षतेने भूल व्यवस्थापन केले. ऑपरेशन थिएटर नर्सिंग स्टाफ वैभव पानसरे तसेच OT मामा यांनी शस्त्रक्रियेदरम्यान महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

या यशस्वी उपचारासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी यांच्या प्रशासकीय सहकार्यामुळे संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा तत्परतेने कार्यान्वित झाली.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिचा श्वसन त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. वेळीच मिळालेल्या तज्ज्ञ उपचारांमुळे मोठा अनर्थ टळला असून रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version