डेन्मार्क: वैज्ञानिकांना 15व्या शतकातील एक भव्य व्यापारी जहाज सापडले असून त्याला “स्वेलगेट 2” (Svelget 2) असे नाव देण्यात आले आहे. हे जहाज “कॉग” (Cog) या प्रकारातील असून, त्या काळात उत्तर युरोपमध्ये व्यापारासाठी अशाच जहाजांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. आतापर्यंत सापडलेले हे सर्वात मोठे कॉग जहाज मानले जात आहे.
हे ऐतिहासिक जहाज सुमारे 28 मीटर लांब, 9 मीटर रुंद आणि जवळपास 6 मीटर उंच आहे, म्हणजेच साधारण दोन मजली इमारतीएवढे. डेन्मार्कमधील कोपनहेगन शहरात समुद्रकिनाऱ्याजवळ सुरू असलेल्या बांधकामादरम्यान पाण्याखाली तपासणी केली असता हे जहाज सापडले. विशेष म्हणजे, या जहाजाचा उपयोग सोने-चांदीसाठी नव्हे, तर लाकूड, मीठ आणि अन्नधान्य यांसारखा जड माल वाहून नेण्यासाठी केला जात होता.
हे जहाज त्या काळातील युरोपियन शहरांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर सामान वाहतुकीचे महत्त्व दर्शवते. त्यामुळेच हे जहाज आकाराने इतके मोठे बनवण्यात आले होते. जहाजाचा खालचा भाग सपाट, तर बाजूंच्या भिंती उंच होत्या. त्यावर एक प्रचंड पाल (sail) बसवण्यात आला होता, ज्यामुळे वाऱ्याच्या साहाय्याने जड वजन सहज वाहून नेता येत असे.
या कॉग जहाजांची सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे, कमी खलाशांमध्येही मोठ्या प्रमाणावर माल वाहून नेण्याची क्षमता. त्यामुळे ते त्या काळातील व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त होते. कोपेनहेगनजवळ सापडलेले हे जहाज त्या काळात युरोपमधील विविध भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
वैज्ञानिकांनी जहाजाच्या लाकडाची तपासणी केल्यानंतर एक रंजक बाब समोर आली. जहाजाच्या बाहेरील फळ्या पोलंडमधील जंगलांतील लाकडापासून, तर आतील संरचना नेदरलँड्समधील लाकडापासून तयार करण्यात आली होती. यावरून त्या काळातही आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांची देवाणघेवाण होत असल्याचे स्पष्ट होते.
समुद्रतळाशी साचलेल्या चिखल आणि मातीच्या जाड थरामुळे हे जहाज शेकडो वर्षे सुरक्षित राहिले. जहाजाचा काही भाग इतका चांगल्या स्थितीत आहे की, त्या काळातील दोरसुद्धा (ropes) अखंड अवस्थेत सापडले आहेत. हा शोध मध्ययुगीन युरोपातील व्यापार, तंत्रज्ञान आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.