Sunetra Pawar: सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री? पुण्यात झळकलेल्या फलकांमुळे एकच खळबळ

बारामती पोटनिवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच झालेल्या या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री? पुण्यात झळकलेल्या फलकांमुळे एकच खळबळ

पुणे: राज्यातील राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत असताना, बारामती पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात झळकलेल्या फ्लेक्समुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान पार पडले असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राच्या भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री’ म्हणून संबोधणारे फ्लेक्स पुण्यात झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मार्केट यार्ड परिसरात लावण्यात आलेल्या या पोस्टरवर “प्रचंड बहुमताने सुनेत्रा पवार निवडून येतील” असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे निकाल जाहीर होण्याआधीच काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे हा आत्मविश्वास आहे की राजकीय खेळी, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Raghav Chadha: भाजपामध्ये प्रवेश केला खरा पण तांत्रिक नियमांत ‘आप’चे बंडखोर खासदार अडकणार; राघव चड्ढा अडचणीत येणार?

याआधीही दिवंगत अजित पवार यांच्याबाबत पुण्यात ‘भावी मुख्यमंत्री’ असे फ्लेक्स झळकले होते. आता त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार यांच्या नावाचे पोस्टर लावल्याने या मागील राजकीय संदेश काय, याची चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टरमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी अविनाश पर्बत यांनी दिलेली आहे 

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप सुनेत्रा पवार यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्या या फ्लेक्सबद्दल कोणत्या भावना व्यक्त करतात, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील काही अंतर्गत मतभेदही अलीकडे समोर आले होते. अशा परिस्थितीत या फ्लेक्समुळे राजकीय वातावरण आणखी तापणार की केवळ चर्चेपुरते मर्यादित राहणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा: Mumbai Local Megablock: मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 15 तासांचा मेगाब्लॉक; कसारा लोकलपासून मेल-एक्स्प्रेसपर्यंत ‘हे’ मोठे बदल, वाचा सविस्तर वेळापत्रक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version