महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटट्यांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २ मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने परीपत्रक जाहीर केले आहे. शाळांची २ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. तसेच १३ जूनपासून शाळांचे नवीन सत्र सत्र सुरू होणार असल्याचे शालेय विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण ४१ दिवस शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भात जून महिन्यातील तापमान विचारात घेता, विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेतील शाळेची वेळ कमी करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. नागपूरमधील शाळा सकाळी ७ ते १०.३० पर्यंतच भरणार आहेत. वाढत्या उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हे आदेश काढले आहेत. याआधी नागपूरमधील शाळांची वेळ ७ ते १२.३०पर्यंत होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.