मुंबई : नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 132 जण निवडून आले. या व्यतिरिक्त निवडणुकीत जिंकून आलेल्या पाच जणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 वर जाऊन पोहोचले आहे. राज्याच्या विधानसभेतील 288 पैकी 137 जागा भाजपाच्या आहेत. सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वैयक्तिक मत असल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
भाजपाच्या पक्ष शिस्तीनुसार राज्यात नेतृत्व कोण करणार ? या प्रश्नाचे उत्तर मोदी – शाह यांच्याकडून मिळेल अथवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जाईल. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतून ठरेल. पण वैयक्तिक मतानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महायुतीने मुंबईत केलेली कामगिरी बघता लवकरच मुंबईत भाजपाचा महापौर दिसेल, असाही विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.
मुंबईवर महायुतीचा झेंडा
मुंबई ही राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी 15 जागांवर भाजपाचा, सहा जागांवर शिवसेनेचा आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. महायुतीने मुंबईतल्या 36 पैकी 22 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे गटाने मुंबईतल्या दहा जिंकल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.