महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही बरेच राजकारण घडायचे बाकी आहे, असा दावा केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले अजून दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे. अकोला दंगलीसंदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणावर वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची परिस्थिती असल्याची काँग्रेसने भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये बरेच राजकारण घडायचे बाकी आहे. त्यानंतर जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल, असे मी मानतो असंही ते म्हणाले आहेत. राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून दंगेखोरांवर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या दंगली थांबणार नाहीत. कर्नाटकमध्ये धार्मिकतेवर नाही तर तेथील मतदारांनी त्यांना जे योग्य वाटले त्यांना मतदान केले. त्यामुळे दंगलीतून मतदान बदलेल असा जो पूर्वीचा काळ होता तो आता संपुष्टात आलेला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.