सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील मध्यरात्रीच्या प्रवासात घडलेली एक गूढ घटना आता संपूर्ण रेल्वे प्रशासनाला धास्तावून सोडत आहे. एका प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल पाच किलो सोने क्षणात गायब झाले. हे सगळं घडताना कुणालाही काहीच कळले नाही, कुणीही काही पाहिले नाही. साधारण पाच कोटी रुपये किंमत असलेल्या या सोन्याच्या चोरीने रेल्वेच्या मध्यरात्रीच्या प्रवासाला रहस्यमय वळण मिळाले आहे. 6 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान सोलापूर ते कल्याण स्टेशनदरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती आहे.
ही घटना ज्यांच्या बाबतीत घडली ते आहेत मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी अभयकुमार जैन. ते आपल्या मुलीसोबत एसी कोच A-1 मध्ये प्रवास करत होते आणि त्यांच्यासोबत दोन ट्रॉली बॅगा होत्या, त्यापैकी एका बॅगेत पाच किलो सोने काळजीपूर्वक बंद करून ठेवलेले. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत वाटत होते. पण 7 डिसेंबरच्या पहाटे, कल्याण स्थानकाजवळ पोहोचण्याच्या आधीच जैन यांना अचानक जाग आली आणि त्यांच्यासमोर भीतीदायक सत्य उभे राहिले, बर्थखाली ठेवलेली लॉक केलेली बॅग पूर्णपणे गायब!
बॅग गायब असल्याचे लक्षात येताच जैन यांनी तातडीने तिकीट निरीक्षक विक्रम मीणा यांच्याशी संपर्क साधला. रेल्वे मदतसेवेलाही कळविण्यात आले. मात्र या सर्वात एक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो, एसी कोचमध्ये, तेही मध्यरात्री लोक झोपेत असताना, कोणीतरी इतक्या सहजतेने बॅग कशी उचलू शकले? चोरट्याने कोचमधील अंधाराचा फायदा घेतला का? की तो आधीपासूनच जैन यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता? कल्याण स्टेशन येथे पोहोचताच जैन यांना जीआरपी कार्यालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी तात्काळ चोरीची नोंद करत तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, कोचमध्ये ये-जा करणाऱ्यांकडे संशयाची नजर टाकली जात आहे आणि काही प्रवाशांची चौकशी सुरू आहे. पण अद्याप या सोन्याचे कोणतेही ठोस पुरावे पोलिसांच्या हातात लागलेले नाही. इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेत, एसी कोचमध्ये, लॉक केलेल्या बॅगेतून मोठ्या प्रमाणात सोने चोरी जाणे, हा केवळ गुन्हा नाही, तर रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर धक्का आहे. चोरटे कुणी बाहेरचे होते, की ते प्रवाशांच्या वेशातच त्याच डब्यात बसलेले होते? तपासाची दिशा जशी पुढे जात आहे, तसतसे या घटनेभोवतीचे गूढ आणखीच घट्ट होत चालले आहे आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेसची ती रात्र आजही प्रश्नांकित सावल्यांनी वेढलेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.