पुणे: काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, भारत सरकारने घेतलेली भूमिका योग्य असून देश म्हणून आपण एकसंघ राहण्याची गरज आहे.
या हल्ल्याचे मूळ पीओके (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शरद पवार म्हणाले की, 'पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत. तिथे शस्त्रास्त्रे आणि स्फोटक सामग्री जमा केली जाते. ही सर्व तयारी पाकिस्तान सरकारकडून होत असल्याची माहिती आहे.' त्यांनी स्पष्ट केलं की भारताने पाकिस्तानची सीमा ओलांडण्याची जबाबदारी घेतली नाही. हवाई दलाने अत्यंत काळजीपूर्वक ही कारवाई केली आहे.
हेही वाचा: इस्त्रायलचा भारताला ठाम पाठिंबा; स्वसंरक्षणाच्या अधिकाराची मान्यता
या हल्ल्यानंतर देशातील वातावरण बदलले असून, काश्मीरमधील स्थानिक जनता देखील या हल्ल्याचा निषेध करत महाराष्ट्रातील जनतेसोबत उभी राहिली आहे. शरद पवारांनी नमूद केले की, काश्मीर विधानसभेत या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आणि ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण काश्मीरमध्ये यापूर्वी अशा घटनांवर फारसा प्रतिसाद मिळत नसे.
शरद पवार म्हणाले की, 'भारताने केलेली कारवाई योग्य असून यामध्ये कोणताही राजकारणाचा हेतू नव्हता. काल रात्री जी कारवाई करण्यात आली त्यामागे आम्ही उभे आहोत.' त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की सर्वपक्षीय बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या आणि या गोष्टींमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे.
या कारवाईनंतर अमेरिका, जपान आणि अन्य देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे, हे सकारात्मक असून भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळाले आहे. मात्र चीनने भारताला पाठिंबा दिला नाही, ही चिंता करण्यासारखी बाब असल्याचे शरद पवारांनी सांगितले. 'सतर्क राहण्याची आवश्यकता आहे,' असे त्यांनी बजावले.
पाकिस्तानविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 'पाकिस्तानला त्यांच्या ताकदीची आणि भारताच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच भारताने धोरणात्मक आणि आर्थिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा विचार चुकीचा नाही.' या मोहिमेला दिलेलं नावही योग्य असून, भारताने आत्मरक्षणासाठी उचललेले पाऊल योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी शरद पवारांनी देशवासियांना एकत्र राहण्याचे आणि या संकटाच्या काळात एकमेकांना साथ देण्याचे आवाहन केले. 'आपली एकता आणि निर्धारच आपल्याला सुरक्षित ठेवेल,' असे ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.