मुंबई: बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालांनी राज्यातील राजकीय चित्र समोर आले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) जनता दल (युनायटेड) यांच्या महायुतीने प्रचंड आघाडी घेत महाआघाडीचा साफ पराभव केला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जेडीयूनेही मजबूत कामगिरी करत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. या निकालांनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूक प्रक्रियेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मीडियाशी बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी झालेल्या रुपया वाटप प्रकारावर निवडणूक आयोगाने कोणतीच ठोस कारवाई न केल्याने सिस्टिम करप्ट दिशेने चालली आहे. त्यांनी सांगितले, “निवडणुकीच्या आधी नागरिकांना 10,000 रुपये वाटप करण्यात आले. हा तर उघडपणे भ्रष्टाचाराचा प्रकार आहे आणि राज्य सरकारनेच तो केला. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने पैसे वाटण्यात आले होते आणि त्याचे परिणाम आम्हालाही भोगावे लागले. ही बाब आम्ही दुर्लक्षित करणार नाही.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, संसद अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधकांची बैठक बोलावून या मुद्द्यावर गंभीर चर्चा केली जाईल. “सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते अधिकाराचा गैरवापर करत आहेत. हा प्रकार निवडणुकीला पारदर्शक मार्गावरून भ्रष्ट मार्गावर नेत आहे. त्यावर काहीतरी करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “पंचायत आणि नगरपरिषद निवडणुका या स्थानिक स्तरावरच्या असतात. राष्ट्रवादी पक्षाने निर्णय घेतलेला आहे की तालुका आणि जिल्हा पातळीवरील आमचे कार्यकर्तेच स्थानिक युती किंवा स्वतंत्र लढाईबाबतचा निर्णय घेतील.”
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शिवसेनेवर अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसते. दोन-तीन दिवस हिअरिंग ठरवलं आणि नंतर पुन्हा पुढे ढकललं. न्यायव्यवस्थेबद्दल बोलता येत नसले तरी जे दिसत आहे ते समाधानकारक नाही. मात्र पिपाणी चिन्ह रद्द केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो.” बिहार निकालांनी भाजप-जेडीयू महायुतीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली असून विरोधक या त्यांचे म्हणणे आणि आरोप आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.