मुंबईत आज 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या “सत्याच्या मोर्चा”कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून, महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येत हे आंदोलन उभारलं आहे. मात्र, या मोर्च्याला अद्याप मुंबई पोलिसांची औपचारिक परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हा मोर्चा विनापरवाना निघण्याची शक्यता आहे. पोलिस परवानगीशिवाय निघणाऱ्या या मोर्च्यामुळे राजकीय तापमान वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. मतदार याद्यांतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी आणि बनावट मतदारांवर कारवाई न झाल्याचा आरोप करत या पक्षांनी मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्च्यात मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार, तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. एकाच मंचावर हे तीन नेते एकत्र दिसणार असल्याने हा मोर्चा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मोर्च्याची सुरुवात दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून होणार असून, तो मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. आयोजकांनी हा मोर्चा दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत काढण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मुंबईतील दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. मात्र, मुंबई पोलिसांनी या मार्गावरून मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली आहे. नियमांनुसार, फक्त आझाद मैदानाच्या आत मोर्चा काढण्याचीच मुभा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे फॅशन स्ट्रीटवरून निघणारा मोर्चा सध्या परवानगीशिवाय असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आयोजकांनी कायदा हातात घेतल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे आयोजक आता परवानगीसाठी अंतिम प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस, वाहतूक विभाग आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत.
महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये मतदार याद्या अद्ययावत करणे, दुबार नावे काढणे, मतदार नोंदणीची मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवणे आणि मतदार याद्या पूर्णपणे तपासल्या जाईपर्यंत निवडणुका पुढे ढकलणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. विरोधकांचा आरोप आहे की, मतदार याद्यांतील गोंधळामुळे अनेक मतदारांचे नाव वगळले गेले आहे, ज्यामुळे निवडणुकीचा निकाल प्रभावित होऊ शकतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्र उपस्थिती हा या मोर्च्याचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरणार आहे. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते एका मंचावर एकत्र येणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मीळ दृश्य आहे. त्यामुळे “सत्याचा मोर्चा” हा फक्त आंदोलन नसून, आगामी निवडणुकांपूर्वीचा राजकीय एकतेचा संदेश असल्याचं मानलं जात आहे.
आता सर्वांचे लक्ष मुंबई पोलिसांच्या अंतिम निर्णयाकडे आहे. जर परवानगी न मिळाल्यास हा मोर्चा कशा पद्धतीने निघेल आणि पोलिस त्यावर काय कारवाई करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आज मुंबईच्या रस्त्यांवर “सत्याचा” आणि “शक्तीचा” संग्राम नक्कीच पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा: New Delhi New Rules: राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषण आणि सायबर गुन्ह्यांवर सरकारची कडक पावले
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.