भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि खेळाडू परुपल्ली कश्यप यांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून अनेक चर्चा रंगत होत्या. काही काळापूर्वी सायनानेच दोघेही विभक्त होणार असल्याचे संकेत दिल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सायनाने एका मुलाखतीत या निर्णयामागील कारणे स्पष्ट करत त्या संपूर्ण काळातील संघर्ष उघड केला आहे.
फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत सायना म्हणाली, “हा निर्णय खूप कठीण होता. खेळ संपल्यानंतर दोघांची आवड, प्राधान्यक्रम आणि विचारसरणी बदलते. कधी-कधी दोघांची दिशा पूर्णपणे वेगळी होऊ लागते.” परुपल्ली कश्यपने निवृत्ती घेत कोचिंग सुरू केल्यानंतर घरातील वातावरणही बदलले, असे सायनाने सांगितले. तिने पुढे सांगितले “कश्यपने अनेक वर्ष कोर्टवर घालवले आणि अचानक खेळ सोडून कोच बनल्यानंतर त्याचे जीवन पूर्ण बदले. आम्हाला वाटू लागले की दोघेही एकमेकांपासून दूर जात आहोत. रोजचे संघर्ष वाढू लागले आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होऊ लागले.”
सायनाच्या मते, परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की दोघांनीही काही काळासाठी “वेगळे होणेच योग्य” असा निर्णय घेतला. सायना आणि कश्यप यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी विवाह केला होता. अनेक वर्षांची मैत्री प्रेमात आणि नंतर लग्नात बदलली होती. त्यामुळे चाहत्यांना त्यांची जोडी नेहमीच विशेष वाटत असे. परंतु यंदाच्या 14 जुलै 2025 रोजी सायनाने सार्वजनिकरित्या विभक्त होण्याचे संकेत दिले आणि सर्वांनाच धक्का बसला.
मात्र काहीच आठवड्यांत, ऑगस्ट महिन्यात दोघांनी एकत्र फोटो शेअर करत नात्याला पुन्हा एक संधी देत असल्याची माहिती दिली. सायना म्हणाली, “आम्ही इतकी वर्षे एकत्र होतो… म्हणून आम्ही या नात्याला अजून एक संधी देण्याचा निर्णय घेतला. एवढ्या सहजतेने सर्वकाही संपवणे योग्य नव्हते.” या मनमोकळ्या खुलासानंतर सायना आणि कश्यप यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना विराम मिळण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.