Rupali Chakankar: ‘माझ्यावर आणि कुटुंबावर होणारे आरोप कपोलकल्पित’; निनावी पत्राच्या ‘त्या’ चर्चेवर रूपाली चाकणकरांनी मांडली ठाम भूमिका

निनावी पत्रावरून होत असलेली बदनामी थांबवावी, असे सांगत सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Rupali Chakankar: ‘माझ्यावर आणि कुटुंबावर होणारे आरोप कपोलकल्पित’; निनावी पत्राच्या ‘त्या’ चर्चेवर रूपाली चाकणकरांनी मांडली ठाम भूमिका

नाशिक: स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, या प्रकरणात नाव चर्चेत आलेल्या रूपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर त्यांनी वेळोवेळी माध्यमांमधून तसेच सार्वजनिकरीत्या आरोप फेटाळले होते. आता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट करत या प्रकरणाबाबत त्यांची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे.

त्यांच्या पोस्टमध्ये चाकणकर यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.”

हेही वाचा: Mumbai Local Train: देशातील पहिली ‘नॉन-एसी’ बंद दरवाजांची लोकल मुंबईत दाखल; कुठे आणि किती वेळ थांबणार?

पुढे त्या लिहतात, “निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे. तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे.” असे ठाम मत त्यांनी मांडले आहे. 

एक्स वरील या पोस्टमध्ये चाकणकर यांनी पुढे लिहले आहे, “यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.”

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे समोर येत असून, अनेक राजकीय कनेक्शनची चर्चा रंगत आहे. मात्र, कोण दोषी आणि कोण निर्दोष हे तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

एकूणच, या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना रूपाली चाकणकर यांनी केलेली ही पोस्ट चर्चेचा नवा विषय ठरत आहे. पुढील काळात तपासातून कोणते सत्य समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Vedanta Power Plant Blast: वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू, 40 कामगार गंभीर जखमी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version