रोहित पवारांची भाजपावर टीका

रोहित पवारांची भाजपावर टीका

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.  त्यानंतर  नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर गौरव यात्रेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी फडणवीसांनी काडतूस शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणाले. मी फडतूस नाही, काडतूस आहे. झुकणार नाही थेट घुसणार, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. फडणवीसांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी महापुरुषांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला. भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरून रोहित पवारांनी भाजपावर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी ट्विट केले की, ‘भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेंव्हा भाजपाने त्याचा ना एका ब्र शब्दानेही निषेध केला, ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो,’ हाच संदेश दिला. शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही!’

भाजपा नेत्यांचा उद्धव यांच्यावर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर फडतूस म्हणून टीका केल्यानंतर भाजपा नेते उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. फडणवीसांवर टीका केली तर उद्धव ठाकरे जिथे जातील तिथे भाजपा रस्त्यावर उतरेल, अशा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. तर, आमदार नितेश राणे यांनी उद्धव यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version