IPL 2026: आयपीएल 2026 हंगाम सुरू होण्यापूर्वीच क्रिकेटविश्वात मोठी उलथापालथ झाली आहे. लोकप्रिय फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाच्या मालकीत मोठा बदल झाला असून हा संघ तब्बल 16,700 कोटी रुपयांच्या आसपासच्या प्रचंड रकमेत विकला गेला आहे. या व्यवहारामुळे RCB आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांच्या पर्पेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजीने एकत्र येत RCB फ्रँचायझी खरेदी केली आहे. याआधी हा संघ युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडे होता, जो डायजिओ या जागतिक कंपनीचा भाग आहे. आता या मोठ्या व्यवहारानंतर संघाच्या व्यवस्थापनातही बदल होणार आहेत.
नवीन मालकीनुसार, आदित्य बिर्ला ग्रुपचे डायरेक्टर आर्यमन विक्रम बिर्ला RCB चे चेअरमन बनणार आहेत, तर टाइम्स ग्रुपचे सत्यन गजवानी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. मात्र, या व्यवहाराला अद्याप बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची अधिकृत मंजुरी मिळणे बाकी आहे. मंजुरीनंतर हा बदल अधिकृतपणे लागू होणार आहे.
आर्यमन बिर्ला हे स्वतः क्रिकेटशी निगडित नाव असून त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे संघाच्या भविष्यासाठी हा अनुभव महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. नवीन मालकांच्या आगमनामुळे RCB च्या ब्रँड व्हॅल्यूत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
RCB चा इतिहास पाहिला तर हा संघ सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. 2008 मध्ये अवघ्या सुमारे 485 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या या संघाने आता हजारो कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही वर्षांत फ्रँचायझीची आर्थिक किंमत झपाट्याने वाढत गेली आहे.
महिला प्रीमियर लीगमध्येही RCB ने आपली छाप पाडली आहे. 2023 मध्ये महिला संघ खरेदी केल्यानंतर 2024 मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2025 मध्ये पुरुष संघाने दीर्घ प्रतीक्षा संपवत पहिले आयपीएल ट्रॉफी जिंकली. या यशामुळे RCB ची लोकप्रियता आणखी वाढली.
संघाच्या यशात विराट कोहलीचे योगदान विशेष मानले जाते. अनेक वर्षे संघाशी निष्ठा ठेवत त्यांनी RCB ला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने चाहत्यांची मोठी फौज निर्माण केली आहे.
RCB च्या विक्रीमुळे आयपीएलमधील फ्रँचायझींच्या किंमतींचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आगामी हंगामात नवीन मालकीखाली RCB कशी कामगिरी करते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.